इराणमधील जनता रस्त्यावर का?

13 Jan 2026 06:00:00
 
आंतरराष्ट्रीय. . .
 
 
 
प्रा. जयसिंग यादव
iran people श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशनंतर अलिकडे इराणमध्येही लोक रस्त्यावर उतरले. नेपाळ किंवा फ्रान्सप्रमाणे जेन झी रस्त्यावर उतरून आपल्याच सरकारला आव्हान द्यायला लागली आहे. राजधानीच्या मुख्य ग्रॅण्ड बाजाराभोवतीही निदर्शने झालीत. निदर्शकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. व्यापारी आणि दुकानदारांनी तेहरानच्या मध्यभागी सादी स्ट्रीटवर आणि राजधानीच्या मुख्य ग्रॅण्ड बाजाराजवळील शुश परिसरात मोर्चा काढला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणच्या चलनाच्या आतापर्यंतच्या नीचांकी घसरणीनंतर आणि देशाच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख मोहम्मद रेझा फरझान यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर ही निदर्शने झालीत. निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी हा लोकांच्या जीवनमानाचा हा रोजचा प्रश्न आहे आणि निदर्शकांच्या मागण्यांना वैध म्हटले आहे. त्यांनी इराणच्या गृहमंत्र्यांना निदर्शकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या न्याय्य मागण्या ऐकण्याचे निर्देश दिले आहेत; जेणेकरून सरकार समस्या सोडवण्यासाठी आणि जबाबदारीने प्रतिसाद देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू शकेल. पाश्चात्त्य निर्बंधांमुळे इराणी अर्थव्यवस्थेला बसलेल्या धक्क्यामुळे निदर्शने सुरू झालीत. खुल्या बाजारातील दरांवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईटनुसार, देशाचे चलन, रियाल अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सुमारे 13 लाख नव्वद हजाराच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. त्यामुळे व्यापक संताप निर्माण झाला. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, सुमारे नव्वद दशलक्ष लोकसंख्येच्या इराणमध्ये रियालच्या घसरत्या मूल्यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या.
 
 

इराण  
 
 
इराणच्या भयानक आर्थिक परिस्थितीत लोक रस्त्यावर उतरले असताना, निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्षांचे फुटेज ऑनलाईन समोर आले. इराण तीव्र महागाई आणि राष्ट्रीय चलनाच्या घसरणीशी झुंजत असताना ही निदर्शने समोर आली आहेत. अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा बराच काळ परिणाम होत आहे; परंतु आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ‘स्टेट स्टॅटिस्टिकल सेंटर’च्या मते डिसेंबरमध्ये महागाई 42.2 टक्क्यांवर पोहोचली. ती नोव्हेंबरपेक्षा 1.8 टक्क्यांनी जास्त आहे. अन्नधान्याच्या किमती 72 टक्क्यांनी वाढल्या आणि आरोग्य आणि वैद्यकीय पुरवठ्याच्या किमती गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी वाढल्या. गेल्या आठवड्याच्या शेवटी इराणचे चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले, तेव्हा त्याच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या. ‘इर्ना’ या इराणच्या मुख्य सरकारी वृत्तसंस्थेनुसार, रियालच्या तीव्र अवमूल्यनामुळे व्यवसायाला धोका निर्माण झाल्यामुळे मोबाईल फोन विक्रेते संतप्त झाले होते. इराणी सरकारने आर्थिक संकटावर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले की, लोकांचे जीवनमान ही माझी दैनंदिन चिंता आहे. सरकारने चलनविषयक आणि बँकिंग प्रणालींमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि लोकांची क्रयशक्ती राखण्यासाठी पावले उचलली आहेत.
महागाई सुमारे पन्नास टक्के असताना वीस टक्के पगारवाढ प्रस्तावित करणाèया त्यांच्या सरकारच्या वादग्रस्त अर्थसंकल्पीय विधेयकाचे समर्थन करताना इराणच्या राष्ट्रपतींनी महागाई आणि महागाई वाढीशी लढण्याचे वचन दिले. तथापि, ही महागाई आणि घसरत्या चलनावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता कमीच दिसते. इराणच्या आर्थिक संकटाविरुद्ध आणि चलन घसरणीविरोधात चौथ्या दिवशीही निदर्शने सुरूच राहिली. दक्षिण फार्स प्रांतातील फासा शहरातील स्थानिक सरकारी इमारतीवर निदर्शकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. इराणी सरकारी माध्यमांच्या मते निदर्शकांच्या एका गटाने फासा गव्हर्नरेट कार्यालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांच्या निदर्शनांमध्ये जमाव पहिल्यांदाच हिंसक झाला आहे. या वेळी सुरक्षा दलांनी हस्तक्षेप करून हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. गटाचे नेतृत्व करणाऱ्या 28 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. सध्याची परिस्थिती निषेधापासून बंडाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. सरकार कधी चर्चेची ऑफर देत आहे तर कधी इशारे देत आहे; परंतु समस्येवर कोणताही उपाय निघत नाही. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी रियाल विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे महागाई आणि राहणीमान बिघडल्यानंतर ही निदर्शने इतर अनेक शहरांमध्ये पसरली. इस्फहान, याझद आणि झांजनसारख्या शहरांमधील विद्यापीठे आणि संस्थांमध्येही निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. शांततापूर्ण निदर्शने कायदेशीर आहेत; परंतु हिंसाचार किंवा अराजकता सहन केली जाणार नाही, असे सरकार सांगत आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या सत्तेला खरोखर धोका आहे का किंवा ही तात्पुरती अशांतता आहे का असे प्रश्न यावेळी उपस्थित केले जात आहेत. इराणमध्ये अस्तित्वात असलेली व्यवस्था आणि सरकारच्या कार्यपद्धतीवरून असे सूचित होत नाही की खामेनी यांचा लवकरच पाडाव होणार आहे. इराणमधील सत्ता केवळ सरकारच्या हातात नाही, तर त्यावर ‘रिव्होल्यूशनरी गार्ड’ (आयआरजीसी), सुरक्षा संस्था आणि धार्मिक संस्थांचेही नियंत्रण आहे. इतिहास दाखवतो की इराणी राजवटीने यापूर्वी मोठी निदर्शने बळजबरीने दडपली आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अमेरिका इराणला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप वारंवार केले जातात. सत्य हे आहे की अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. तेल निर्यातीवरील बंदी आणि बँकिंग व्यवस्थेच्या èहासामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सध्याच्या निदर्शनांमागे अमेरिकेचा थेट हात असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसला, तरी इराणमधील निदर्शनांशी अनेकदा अमेरिकेचा संबंध जोडला जातो.iran people कारण डोनाल्ड ट्रम्प सध्या त्या देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प आणि जॉन बोल्टनसारख्या अमेरिकन नेत्यांनी इराणमध्ये सत्ताबदलाची सातत्याने वकिली केली. अर्थात ट्रम्प यांनी कधीही स्पष्टपणे सत्ता बदलण्याचा हेतू जाहीर केला नाही. त्यांच्या मागील कार्यकाळात (2018) ट्रम्प यांनी ट्विटरवर लिहिले होते की इराणी नेत्यांना इतिहासात कधीही न पाहिलेले परिणाम भोगावे लागतील. हे विधान राजवट बदलण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची धमकी म्हणून पाहिले जात होते.
2020 मध्ये कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर ट्रम्प यांनी असेही लिहिले की, इराणी राजवटीला युद्ध हवे असेल, तर इराणचा अंत होईल. तथापि, ट्रम्प यांनी नंतर स्पष्ट केले की, ते राजवट बदलाबद्दल बोलत नव्हते. त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की, अमेरिकेला राजवट बदल नको आहे; परंतु सध्याच्या निदर्शनांना मिळत असलेल्या पाठिंब्यावरून अमेरिका एका अर्थाने इराणमध्ये उठाव भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. विद्यापीठातील विद्यार्थीदेखील निदर्शनांमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी ‘हुकूमशहा मरण पावला’सारख्या सरकारविरोधी घोषणा दिल्या. या घोषणा खामेनी यांच्याशीदेखील जोडल्या जात आहेत, कारण ते देशाचे सर्वोच्च नेते आहेत. काही निदर्शक 1979 च्या इस्लामिक क्रांतीमध्ये पदच्युत झालेल्या दिवंगत शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्या मुलाच्या समर्थनार्थ घोषणा देतानाही ऐकले गेले. त्यात ‘शाह चिरंजीव होवो’सारख्या घोषणांचाही समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेत निर्वासित जीवन जगणारे रेझा पहलवी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, मी तुमच्यासोबत आहे. आपण जिंकू, कारण आपले ध्येय बरोबर आहे आणि आम्ही एक आहोत. ते पुढे म्हणाले की, ही राजवट सत्तेत राहील, तोपर्यंत देशाची आर्थिक परिस्थिती बिघडतच राहील. यावरून इराणमधील संघर्ष कोणत्या थराला गेला आहे आणि तिथल्या सत्ताधीशांविरोधात नाराजी किती वाढली आहे, हे लक्षात येते.
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0