जिल्हा परिषद निवडणुकांआधीच शरद पवारांना धक्का

14 Jan 2026 16:53:45
पुणे,
A setback for Sharad Pawar जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच कोकणातील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकत राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात राजकीय चर्चांना वेग आला असून, शरद पवार गटासाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे. दीर्घकाळ पक्षासाठी निष्ठेने काम करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची भावना रमेश कदम यांनी व्यक्त केली आहे. कोकणात पक्ष अडचणीत असताना आपण एकाकी उभे राहून काम केले, मात्र त्याच पक्षाने आपल्यालाच एकटे पाडल्याचा आरोप त्यांनी केला. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असताना पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळाले नाही, ही खंतही त्यांनी उघडपणे मांडली आहे.
 
 
sharad pawar
राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना रमेश कदम म्हणाले की, सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत प्रामाणिकपणाला किंमत उरलेली नाही. जिथे आपली गरज नाही, तिथे जबरदस्तीने थांबण्यात काहीच अर्थ नसतो, अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. आपण १९८४ पासून आदरणीय शरदचंद्र पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे नमूद करत कदम यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वावर आजही आपला विश्वास असल्याचे सांगितले. पक्षासाठी काम करण्याची वेळ आली की आपण नेहमी पुढे राहिलो, मात्र जेव्हा आपल्याला साथ देण्याची वेळ आली, तेव्हा पक्षाने पाठ फिरवल्याची भावना त्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.
 
रमेश कदम हे कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, चिपळूण नगराध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. कोकणातील राजकारणात भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील वैर सर्वश्रूत असून, या पार्श्वभूमीवर झालेला राजीनामा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Powered By Sangraha 9.0