असीम मुनीर यांची नवी चाल?काश्मीरपासून राजस्थानपर्यंत ड्रोनने घुसखोरी

14 Jan 2026 09:44:52
नवी दिल्ली,
Asim Munir's new move नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारत–पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठा पराभव पत्करूनही पाकिस्तान आपली आक्रमक रणनीती बदलण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. जम्मू–काश्मीरपासून राजस्थानपर्यंत पाकिस्तानी ड्रोन हालचाली वाढल्या असून, गुजरात–सिंध सीमेवरील वादग्रस्त सर क्रीक भागातही लष्करी जमाव करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली नेमकी कोणती योजना राबवली जात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 

Asim Munir 
गेल्या काही दिवसांत नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोन सातत्याने दिसून आले आहेत. जम्मू–काश्मीरमधील सांबा, राजौरी आणि पूंछ भागात ड्रोन घुसखोरीचे प्रयत्न झाले असून, भारतीय सैन्याने तात्काळ प्रत्युत्तर देत अनेक ड्रोन पाडले आहेत. याच दरम्यान राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील रामगड गॅस थर्मल पॉवर प्लांट परिसरात ड्रोन आढळून आल्याने खळबळ उडाली. हा परिसर अत्यंत संवेदनशील आणि कडक सुरक्षा असलेला असल्याने पाकिस्तानच्या हेतूंवर संशय अधिक गडद झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, ड्रोनचा वापर शस्त्रास्त्रे, अंमली पदार्थांची तस्करी किंवा गुप्तहेर कारवायांसाठी केला जात असल्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही नियंत्रण रेषेजवळ सहा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे दोन दहशतवादी छावण्या सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानने आपल्या हद्दीतून उडणाऱ्या ड्रोनवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा भारत कठोर पावले उचलेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही कोणत्याही चिथावणीला भारत त्वरित आणि ठोस उत्तर देईल, असे ठामपणे नमूद केले आहे. दरम्यान, सर क्रीक परिसरात पाकिस्तानने लष्करी हालचाली मोठ्या प्रमाणात वाढवल्याचे अहवाल समोर आले आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत या दलदलीच्या आणि सागरी भागात पाकिस्तानी सैन्याची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या नुकसानीनंतर पाकिस्तानने या भागाला पूर्णतः लष्करी क्षेत्राचे स्वरूप दिल्याचे दिसते. सिंध रेजिमेंटच्या क्रीक बटालियनची संख्या दोनवरून सहा करण्यात आली असून, सुजावल, घारो आणि बदिननंतर जटी व केटी बंदर परिसरात नव्या बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, याठिकाणी पूर्वी तैनात असलेल्या निमलष्करी रेंजर्सच्या जागी आता नियमित सैन्य तुकड्या आणण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानी नौदल आणि हवाई दलाची तयारीही वाढवण्यात आली आहे. बंधा धोरा आणि हरामी धोरा दरम्यान नव्या सागरी सुरक्षा चौक्या उभारण्यात आल्या असून, भोलारी फॉरवर्ड एअरबेसवर JF-17 आणि J-10C लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. चीनच्या मदतीने आधुनिक रडार यंत्रणा, AWACS आणि P-3 ओरियन सागरी गस्त विमानेही या भागात कार्यरत करण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून भारतानेही आपल्या संरक्षण सज्जतेत मोठी वाढ केली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रित त्रि-सेवा युद्ध सराव केला, जो सर क्रीकच्या दलदलीपासून थेट जैसलमेरपर्यंत पसरलेला होता. या सरावात एआय आधारित ट्रॅकिंग प्रणाली, ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याशिवाय गुजरातच्या किनाऱ्यावर नवे कोस्ट गार्ड रडार स्टेशन उभारण्यात आले असून, मरीन कमांडोजची तैनाती वाढवण्यात आली आहे. भूज लष्करी तळावर आधुनिक L-70 हवाई संरक्षण तोफांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.
सर क्रीक वाद हा भारत आणि पाकिस्तानमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमावाद आहे. कच्छच्या रणाच्या सुमारे ९६ किलोमीटर लांबीच्या खाडीवरून हा वाद निर्माण झाला आहे. १९१४ मधील तत्कालीन कच्छ संस्थान आणि सिंध सरकार यांच्यातील कराराच्या वेगवेगळ्या अर्थ लावण्यामुळे हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पाकिस्तान संपूर्ण सर क्रीकवर आपला हक्क सांगतो, तर भारत आंतरराष्ट्रीय ‘थलवे’ तत्त्वानुसार खाडीच्या मध्यभागातून सीमा जाण्याचा दावा करतो. सध्याच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे हा जुना वाद पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0