ब्रह्म पुराण

14 Jan 2026 05:30:00
 
ब्रह्म पुराण
brahma purana अठरा पुराणांतील अत्यंत गोड असलेले पुराण म्हणजे ब्रह्म पुराण. भगवान विष्णूंच्या परब्रह्म स्वरूपाचे ज्यात वर्णन आहे म्हणून ते ब्रह्म पुराण. भगवंताच्या दशावताराचेही संक्षेपात वर्णन या पुराणात आहे. याशिवाय भारत देशाचे माहात्म्य, सूर्यादी ग्रहमंडलाची स्थिती इत्यादी वर्णन यात आहे. भगवान श्रीकृष्णाचे विस्तृत चरित्र या पुराणात आहे. पुराण आणि दशावतार यांची आपण सांगड घालत असल्याने याच पुराणात दशावतार संक्षेपात असले तरीही पुढील भगवान परशुराम अवताराबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
 

brahm puran 
 
 
भगवान परशुराम अवतार म्हणजे ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम आहे. साधूंचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश हा भगवंताचा अवतार उद्देश या परशुराम अवतारात ठळक दिसतो. जमदग्नी महामुनी आणि रेणुकामाता यांच्या पोटी आलेला हा बालक म्हणजे
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
 
चार वेदांचे ज्ञानी म्हणून ब्रह्मतेजस्वी आणि धनुर्धारीमध्ये अग्रणी म्हणून क्षात्रतेजस्वी असे त्यांचे वर्णन केले आहे.
वडील जमदग्नींच्या आज्ञेचे पालन म्हणून आईचे मस्तक उडविले आणि प्रसन्न झालेल्या वडिलांकडून पुन्हा माता रेणुकेला जीवन मिळवून देणारा मातृ-पितृभक्त म्हणजे भगवान परशुराम.
 
आपल्या वडिलांना म्हणजे ऋषी जमदग्नी यांना मिळालेली कामधेनू कार्तवीर्य अर्जुन पळवून नेतो आहे म्हणून त्या सहस्रार्जुनाचा वध करून आश्रमातील ऋषींना अभय देणारे महापराक्रमी परशुराम अवतार आहेत. भगवान परशुराम साधनेसाठी गेलेत हे पाहून सहस्रार्जुनाच्या मुलांनी जमदग्नींच्या आश्रमावर हल्ला करून जमदग्नींना ठार मारले. हे ऐकताच पृथ्वीवरील दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ज्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या मुलांसह 21 वेळा पृथ्वीवरील दुष्टांचा नि:पात केला ते क्षात्रतेजस्वी भगवान परशुराम आहेत.
 
या हत्येचे पातक फेडण्यासाठी यज्ञ करून यज्ञाचे आचार्य कश्यप ऋषींना संपूर्ण पृथ्वी दान करून ज्यांनी महेंद्र पर्वतावर साधना सुरू केली ते महायोगी भगवान परशुराम. संपूर्ण पृथ्वी दान केल्यामुळे स्वत:ला जागा हवी म्हणून आपल्या परशूने ज्यांनी आपल्या सामर्थ्याने समुद्राला मागे हटवून परशुराम क्षेत्र म्हणजे केरळ, कोकण, गोवा किनारपट्टी निर्माण केली ते सामर्थ्यवान भगवान परशुराम आहेत.
 
ज्यांना स्वयं भगवान शंकराने परशू दिला म्हणून ते परशुराम झालेत. त्यांचे शिष्य देखील भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण आणि रुख्मीसारखे एक एकाचेनी मनोव्यापारे, अवघे विश्व संहारे असे होते. जे चिरंजीव असल्यामुळे चारही युगात कार्यरत होते आणि आहेत. कृत युगात ज्यांच्या परशू प्रहाराने भगवान गणेशाचा एक दात खुडला त्यामुळे गणपती एकदंत झाले. त्रेता युगात ज्यांच्या धनुष्यभंगामुळे श्रीराम-जानकी विवाह झाला. द्वापार युगात भीष्म-द्रोणादींना शिष्यत्व दिले, भगवान श्रीकृष्णाला साहाय्यभूत झालेत आणि कलियुगात आजही ज्यांचे अस्तित्व जाणवते ते भगवान परशुराम आहेत. त्यांची कथा या ब्रह्म पुराणात आहे. याशिवाय ब्रह्म पुराणात राजा पृथुची कथा, चौदा मन्वंतरे, वैवस्वत मनुंचे वंशज, सगर राजाचे चरित्र दिले आहे.
 
जंबुद्वीपासह विविध सहा द्वीपांचे वर्णन, भारत वर्षाचे वर्णन दिले आहे. भगवान सूर्यनारायणाचे माहात्म्य आणि त्यांची नावे दिली आहेत. माता पार्वतीची तपश्चर्या, स्वयंवर आणि भगवान महादेवाशी विवाह, दक्ष यज्ञ विध्वंस. मार्कंडेय चरित्र, विविध तीर्थ वर्णन या पुराणात आहेत. अनंत वासुदेव माहात्म्य, कण्डूमुनींचे चरित्र दिले आहे.brahma purana अध्याय 72 ते 84 पर्यंत भगवान श्रीकृष्ण चरित्र दिले आहे.
यमलोक, यमद्वार, नरक इत्यादींबाबत माहिती या पुराणात आहे.
धर्मकार्य, अधर्म, अन्नदानाचे महत्त्व, गृहस्थाश्रमाचे धन्यत्व, वर्ण आणि आश्रम व्यवस्था, एकादशी माहात्म्य, नैमित्तिक आणि प्राकृतिक प्रलय वर्णन, त्रिविध तापाचे वर्णन, अध्यात्म-ज्ञान-विज्ञान, योग, क्षर आणि अक्षरयोग याच पुराणात दिला आहे. देवी पार्वतीचे अद्भुत चरित्र, गौतमी, गंगा तथा गोदावरी स्नानाचे महत्त्व या पुराणात दिले आहे.
गृहस्थाश्रमाचे श्रेष्ठत्व देताना हे पुराण सांगते-
आश्रमाणि च चत्वारि कर्मद्वाराणि मानदः ।
चतुर्णामाश्रमाणाम् च गार्हस्थ्यं पुण्यदम् स्मृतम् ।
सामाजिक समरसता आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. वर्ण जन्माने नाही तर कर्माने ठरत असे.
 
सर्वोऽयं ब्राह्मणो लोके वृत्तेन तु विधीयते ।
वृत्ते स्थितश्च शूद्रोऽपि ब्राह्मणत्वं च गच्छति ।।
 
गुणवान व्यक्ती जन्माने शूद्र असेल तरीही तिची गणना ब्राह्मण म्हणून होत असे.
कन्या, पुत्र, पृथ्वी, गाय विक्रीला निर्बंध असल्याचेही इथे दिले आहे. त्याला नरक प्राप्ती सांगितली आहे.
 
कन्यापुत्रमहीबाजिगवां विक्रयकारिण: ।
नरकांत निवर्तन्ते यावदाभूतसंप्लवम ।।
 
अतिथीचे स्वागत, आदरातिथ्य आपल्या संस्कृतीचा भाग होता.
 
अभ्यागतमनु श्रान्तम् सूर्योढं गृहमागतं ।
तं विद्याद्देवरूपेण सर्वक्रतुफलो ह्यसो ।
थोडक्यात, ब्रह्म पुराणातील परशुराम अवतार ब्रह्मतेज आणि क्षात्रतेजाचा समन्वय होता. त्यामुळेच या भूमीला देवभूमी म्हणत असत. आज मात्र दुर्दैवाने ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्यातला समन्वय नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणूनच आपली पुराणे आपला इतिहास असून त्याचा अभ्यास करणे आणि त्याचे अनुसरण म्हणजे भारतीयत्वाची दृढ स्थापना होय.
 
प्रा. दिलीप जोशी, वाशीम
9822262735
Powered By Sangraha 9.0