नवी दिल्ली,
Ex-husband accuses Mary Kom सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या भारताच्या दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोम यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा वाद समोर आला असून, त्यांच्या माजी पती करूंग ओनलर यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मेरी कोमचे लग्न असतानाच एका ज्युनियर बॉक्सरसोबत प्रेमसंबंध होते, असा दावा ओनलर यांनी केला आहे. हे आरोप त्यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना मांडले असून, त्यामुळे क्रीडा विश्वात आणि चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. करूंग ओनलर यांच्या म्हणण्यानुसार, २०१३ साली मेरी कोमचे एका तरुण बॉक्सरसोबत संबंध होते. या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता, मात्र त्यानंतर काही काळासाठी समेट करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. मात्र, हा वाद पुढेही कायम राहिला आणि नात्यातील दरी वाढत गेली, असा दावा ओनलर यांनी केला आहे.

इतकेच नव्हे, तर ओनलर यांनी आणखी एका कथित संबंधाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१७ मध्ये मेरी कोम तिच्या अकादमीत काम करणाऱ्या एका पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दाव्याच्या समर्थनार्थ आपल्याकडे व्हॉट्सअॅपवरील संभाषण आणि संबंधित व्यक्तीचे नाव उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मेरी कोम आणि करूंग ओनलर यांनी गेल्या वर्षी अधिकृतपणे घटस्फोट झाल्याची पुष्टी केली होती. हे आरोप अशा वेळी समोर आले आहेत, जेव्हा मेरी कोम यांनी एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात आपल्या माजी पतीवर गंभीर आरोप केले होते. त्या कार्यक्रमात मेरी कोम यांनी सांगितले होते की, ओनलर यांनी त्यांच्या नावावर कर्ज घेतले, तसेच त्यांच्या नकळत काही मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित केल्या. घरखर्च आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरच होती, तर पती कोणतेही उत्पन्न मिळवत नव्हते, असा आरोपही त्यांनी केला होता.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना करूंग ओनलर यांनी स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मेरी कोम अकादमीच्या उभारणीत आपण महत्त्वाची भूमिका बजावली असतानाही आपल्याला बाजूला सारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, मेरी कोम यांनी आपल्याकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला असल्यास, संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आव्हानही ओनलर यांनी दिले आहे. दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे भारताच्या सर्वात यशस्वी बॉक्सरपैकी एक असलेल्या मेरी कोम यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा वाद निर्माण झाला असून, हा वाद पुढील काळात कायदेशीर वळण घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.