नागभीड तालुक्यातील टेकरी शिवारातील घटना
नागभीड :
येथील वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या टेकरी शिवारात झालेल्या Nagbhid: Tiger attack वाघाच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. भाऊराव विठोबा राऊत (60, रा. तोरगाव) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. भाऊराव राऊत यांचे शेत टेकरी गावालगत असून, ते सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतात तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आले होते. शेतातील काम आटोपून ते घरी जाण्याच्या तयारीत असतानाच अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Nagbhid: Tiger attack शेत हे गावालगत व रस्त्याच्या कडेला असल्याने ये-जा करणार्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागभीड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाघाने अगदी मानवी वस्तीच्या जवळ हल्ला केल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड दहशत पसरली आहे. आता शेतातील पिके कापायची कशी, माल घरी आणायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान, परिसरात वाघाचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.