- राजाराम डोनारकर यांचे असेही दातृत्व
- आतापर्यंत ७०० मुलांना दिला लाभ
अनिल फेकरीकर
नागपूर,
ज्या समाजामुळे आपण मोठे त्याप्रती काही तरी देणे लागतो. अर्थात समाजऋण सर्वांनीच फेडायला हवे, अगदी हाच विचार डोक्यात येताच एका व्यक्तीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी ७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायकली भेट देत समाजऋण फेडण्याचे समाधान मिळवले आहे.
आता तर हे सायकलमॅन चक्क गरजवंत विद्यार्थ्यांसाठी देवदूतच ठरले आहे. Rajaram Donarkar राजाराम डोनारकर असे त्या समाजऋण फेडणार्या दानशुराचे नाव आहे. नंदनवन भागात राजाराम डोनारकर यांचे सायकल विक्रीचे दुकान आहे. बालपणी प्रचंड हालअपेष्टा भोगलेल्या राजाराम डोनारकर यांना गरीबीची जाण आहे. म्हणूनच की काय सायकल अभावी कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये अशीच त्यांची तळमळ असते. जेव्हा त्यांच्याकडे एखादा गरीब मुलगा येतो अन् काका शाळेत जायला सायकल नाही असे सांगतो, तेव्हा ते संपूर्ण चौकशी करून त्याची मागणी पूर्ण करतात.
मुळात पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावचे रहिवासी असलेल्या Rajaram Donarkar राजाराम डोनारकर यांना बालपणापासूनच सायकलची आवड होती. सायकल हेच त्यांचे विश्व होते. म्हणूनच की काय त्यांनी सायकलच्या व्यवसायात पाय रोवला. टेकाडी गावची मोनाली अभिनाथ ढोरे या मुलीला सन १९९६ मध्ये सायकल देत आपल्या समाजऋण फेडण्याच्या उपक‘माचा शुभारंभ केला. आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त गरजवंत मुला-मुलींना सायकलींचे वाटप करीत त्यांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला आहे. शेवटी, देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे. अर्थात प्रत्येकाने समाजासाठी काही तरी करायलाच हवे. हीच त्यांनी अमलात आणत सायकल वाटपाचा सुरू केलेला उपक्रम शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आहे.