पिंपरी,
sisters-die-in-kalewadi-accident : संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा काळेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. काळेवाडीतील बीआरटी मार्गावर रहाटणी फाटा परिसरात बुधवारी (दि. १४ जानेवारी) दुपारी सव्वाएकच्या सुमारास ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०, दोघी रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावे आहेत. अपघातात ट्रक चालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि नेहा दुचाकीवरून पुनावळे येथून पिंपरीच्या बाजारपेठेकडे जात असताना रहाटणी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
या धडकेत दोघींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले. हा ट्रक नागपूरहून वाटाण्याचा माल घेऊन पुण्यात आला होता आणि परतीच्या प्रवासात हा अपघात झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
अपघातात मृत्यू झालेली ऋतुजा ही वकील असून तिने ताथवडे येथील महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते, तर नेहा ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. वडील पांडुरंग शिंदे यांचा मिरची कांडपाचा व्यवसाय असून आई कमल शिंदे गृहिणी आहेत. शिंदे दाम्पत्याला दोनच मुली होत्या आणि दोघीही कुटुंबाचा आधार बनत होत्या. मात्र, या अपघाताने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे पुनावळे आणि परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.