मुंबई,
Untimely crisis in Maharashtra बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर पुन्हा एकदा दिसू लागला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कधी कडाक्याची थंडी, कधी अचानक पावसाच्या सरी, तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यानंतर अनेक भागांत पहाटे तीव्र थंडी, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी दमट वातावरण असे बदलते चित्र कायम आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचवेळी देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशात दाट धुक्याची चादर पसरल्याचा अंदाज आहे. दक्षिण आणि उत्तर भारतात तयार झालेल्या वेगवेगळ्या हवामान परिस्थितींचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

संक्रांतीच्या पूर्वसंध्येलाही मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. याच काळात राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. धुळे आणि परभणीसारख्या शहरांमध्ये किमान तापमान थेट ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंशांच्या आसपास पोहोचल्याने गारठा वाढला आहे. पुढील २४ तासांत राज्यातील किमान तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी त्यानंतर दोन ते तीन अंशांनी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवू शकतो. मुसळधार पावसाची शक्यता कमी असली, तरी दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी आर्द्रता कमी राहणार असल्याने कोरड्या आणि थंड हवामानाचा अनुभव नागरिकांना येईल. कोकण पट्ट्यातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामानात फारसा बदल जाणवणार नसला, तरी कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर महाराष्ट्रातील थंडी मकर संक्रांतीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात गारठा अद्याप कायम आहे. बीड, धाराशिव, जालना, लातूर आणि परभणी जिल्ह्यांत सकाळच्या वेळेस धुक्याचे वातावरण दिसून येत आहे. या भागांमध्ये किमान तापमान ८ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. एकूणच, दक्षिण आणि उत्तर दिशेने घडणाऱ्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी तर काही भागांत कडाक्याची थंडी अशी मिश्र परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.