निवडणूक कर्मचारी सज्ज
महापालिकेसाठी आज मतदान
अमरावती,
Voting for the municipal corporation is today. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार १५ जानेवारीला मतदान होणार आहे. सकाळी ७.३० वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रकडे रवाना झाले.
महापालिकेच्या २२ प्रभागातल्या ८७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. एकूण मतदारांची संख्या ६ लाख ४७ हजार ५७ आहे. एकूण ८०५ मतदान केंद्र गठीत करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्षाचे व अपक्ष असे एकूण ६६१ उमेदवार रिंगणात उतरले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती महानगरपालिकेल्या सातही झोन कार्यालयांमार्फत मतदानासाठी आवश्यक असलेले साहित्य निवडणूक कर्मचार्यांना बुधवारी वितरित करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन), मतदार यादी, मतदानासाठी लागणारे शिक्के, सील, फॉर्म्स, ओळख पटविण्याचे साहित्य तसेच इतर पूरक साहित्याचा समावेश आहे. साहित्य वितरणाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
Voting for the municipal corporation is today. साहित्य स्वीकारल्यानंतर सर्व निवडणूक कर्मचारी ईव्हीएम मशीनसह आपल्या संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासन, गृह रक्षक दल व इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे, उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.