अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
15 Jan 2026 20:25:19
भाविकांची सुरक्षा संकटात
वाशीम,
जिल्ह्यातील मालेगांव तालुयातील शिरपूर जैन येथील विश्वप्रसिद्ध असलेल्या Antariksha Parshwanath temple श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिरात यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील आठवड्यात काही विघ्नसंतुष्टानी बंद पाडल्यामुळे देशभरातून येथे येणार्या सर्व भाविक, यात्रेकरू व दर्शनार्थींची सुरक्षा संकटात आली आहे. कॅमेरे बंद पडल्याने अकस्मात अनुचित प्रकार अथवा कुठली घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
शिरपूर नगरीत जैन धर्मीयांचे २३ वे तीर्थंकर Antariksha Parshwanath temple श्री पार्श्वनाथ भगवान यांचे पुरातन काळातील मंदिर अस्तित्वात आहे. हे मंदिर प्राचीन व ऐतिहासिक असून ते जगप्रसिद्ध आहे. येथील श्री पार्श्वनाथ भगवंताची मुख्य मूर्ती जमीनीपासून अधर आहे. सन १९८१ पासून २०२३ पर्यंत आपसी वादामुळे मंदिर बंद करण्यात आले होते. मात्र २२ फेब्रुवारी २०२३ व ४ एप्रिल २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे मंदिर उघडल्यानंतर पूजन व दर्शनाकरिता नियमित सुरू झाले आहे. तब्बल ४२ वर्षानंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या दर्शन पूजनासाठी दिवसेंदिवस भाविकांची व दर्शनार्थींची हजारोंच्या संख्येत गर्दी वाढत आहे. येथे येणार्या यात्रेकरू भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. क्षेत्रपाल देवाच्या भुयारातील सदरचे कॅमेरे काही विघ्नसंतुष्ट लोकांनी फोडल्याची घटना समोर आल्याने सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आले. यानंतरही त्याच विघ्नसंतुष्ट लोकांनी मुख्य सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा दुसर्यांदा बंद पाडल्यामुळे संपूर्ण मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहे.यामुळे मंदिरात पूजन दर्शनाकरिता येणार्या यात्रेकरू भाविकांची व दर्शनार्थींची सुरक्षा संकटात सापडली आहे.