चंद्रपूर महानगरात 3.30 वाजेपर्यंत 38.12 टक्के मतदान

15 Jan 2026 21:39:06
*सर्वाधिक 44.25 टक्के भिवापूर प्रभागात
*सर्वात कमी 34.44 टक्के मतदान विवेक नगर प्रभागात

चंद्रपूर, 
Chandrapur Municipal Corporation elections चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत गुरूवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 38.12 टक्के मतदान झाले होते. त्यात सर्वाधिक 44.25 टक्के मतदान भिवापूर प्रभागात, तर विवेक नगर प्रभागात सर्वात कमी 34.44 टक्के मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत 5.30 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली नसली, तरी 55 टक्के मतदान झाले असल्याची शक्यता आहे.
 
 
chddsk
 
Chandrapur Municipal Corporation elections दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58 हजार 55 पुरुष मतदारांनी, तर 55 हजार 310 महिला मतदार तसेच 2 अन्य अशा एकूण 1 लाख 14 हजार 367 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात दे. गो. तुकूम प्रभागात 38.60 टक्के, शास्त्रीनगर प्रभागात 39.04 टक्के, एमईएल प्रभागात 36.22 टक्के, बंगाली कॅम्पमध्ये 40.36 टक्के, इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभागात 37.51 टक्के , जटपुरा प्रभागात 35.34 टक्के, वडगाव प्रभागात 38.50 टक्के, नगिना बागमध्ये 37.94 टक्के, एकोरी मंदिर प्रभागात 36.93 टक्के, भानापेठ वॉर्डात 38.34 टक्के, महाकाली मंदिर प्रभागात 37.75 टक्के, विठ्ठल मंदिर वॉर्डात 38.76 टक्के, बाबूपेठ वॉर्डात 35.97 टक्के, लालपेठ कॉलरी प्रभागात 39.01 टक्के, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागात 40.56 टक्के मतदान झाले आहे.
मतदार यादी दोषरहित करण्याची गरज : आ. मुनगंटीवार
लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदार यादी दोषरहित असणे अत्यंत आवश्यक असून, मतदान प्रक्रियेत अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. येथील सरदार पटेल महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग या संपूर्ण प्रक्रियेवर साडेपाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करतो. मात्र, तरीही अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात. ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे. मतदार याद्या वेळोवेळी दुरुस्त होणे आणि त्या अचूक असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान अनिवार्य करण्याबाबत कायदा करता येईल का, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
 
मतदानाची शाई निघून जात आहे : आ. वडेट्टीवार
पूर्वी आठवडाभर मतदानाची शाई निघत नव्हती. नख व कातडे निघून जायचे पण शाई काही केल्या पुसली जात नव्हती. पण आता मार्कनने शाई लावली जात आहे. ती तत्काळ पुसली जाते. मला अनेकांचे तसे फोन आले. मी आयुक्तांशीही बोललो. नऊ वर्षांनी ही महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. एकतर यावेळी व्हिव्हि पॅडचा वापर होताना दिसत नाही. दुसरीकडे लावलेली शाई क्षणात निघून जात आहे. बोगस मतदान करायचा हा घाट आहे का, असा प्रश्न विचारत, निवडणुका कशाही करून जिंकायच्या हा यामागचा हेतू आहे, असा आरोप काँगे्रसचे गट नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे केला.
Powered By Sangraha 9.0