मुंबई,
Chief Minister's warning on the attacks राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आई आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शाईऐवजी लावलेल्या मार्करबद्दल उठलेल्या चर्चांवर सूचक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे. मतदान हा फक्त अधिकार नाही, तर आपले कर्तव्यही आहे. मतदान न करणे म्हणजे लोकशाहीतील कर्तव्याचे पालन न करणे होय. म्हणून मी मतदान केले आणि सर्वांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन करतो. चांगले मतदान झाले तर योग्य लोक निवडून येतात.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महानगरपालिकांमध्ये जनता भरघोस मतदान करावी, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आमच्या उमेदवारांवर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी भ्याड हल्ला केला होता, ज्यात एका उमेदवाराचा हात फ्रॅक्चर झाला आणि डोके फोडले गेले. मात्र लोकशाहीमध्ये निवडून येत नसल्यास ठोकशाही करणे योग्य नाही; हल्ल्यांचा परिणाम निकालावर पडणार नाही. राज ठाकरे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, शाईऐवजी मार्कर वापरणे ही इलेक्शन कमिशनची ठराविक पद्धत आहे. यावर जर कोणाला तक्रार असेल तर आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. काही लोक फक्त उद्याच्या निकालावर दोष देण्याची तयारी करत आहेत. मात्र महाराष्ट्रात केवळ विकास चालेल, जनता विकासाच्या पाठीशी राहील आणि मतदान त्यानुसार करेल, यावर मला पूर्ण विश्वास आहे.