क्रिप्टो फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; कोट्यवधींची मालमत्ता जप्त

15 Jan 2026 15:33:02
नागपूर,
Crypto fraud case : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या कुख्यात निशिद महादेवराव वासनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाशी संबंधित नागपूरमधील तीन ठिकाणी छापे टाकून ईडीने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली आहेत. यासोबतच बँक खात्यातील २० लाख रुपये आणि सुमारे ४३ लाख रुपयांचे क्रिप्टो वॉलेट गोठवण्यात आले आहे.
 
 
Crypto fraud case
 
 
निशिद वासनिकने ‘इथर ट्रेड एशिया’ नावाच्या कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आश्वासन देत देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढले. आलिशान हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन लोकांना आकर्षित करण्यात आले आणि सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन केला. मात्र, मोठी रक्कम गोळा झाल्यानंतर निधीची विल्हेवाट लावून निशिद भूमिगत झाला. काही गुंतवणूकदारांनी पैसे मागितल्यानंतर त्यांना धमकावल्याचेही तपासात उघड झाले आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडित गुंतवणूकदारांनी गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात २००० हून अधिक लोकांची तब्बल ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी निशिद, त्याची पत्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून एक आलिशान कार जप्त केली. फसवणुकीच्या पैशातून निशिदने नागपूर, चंद्रपूर, पुणे तसेच मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याचेही समोर आले.
या प्रकरणाची दखल घेत ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला आणि छापेमारी केली. सध्या निशिद वासनिक आणि त्याचे सहकारी तुरुंगात असून, फसवणुकीतून मिळालेल्या निधीचा मोठा हिस्सा नेमका कुठे गुंतवण्यात आला आहे, याचा शोध अद्याप सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0