नागपूर,
Dr. Bhagwat appealed for voting नागपूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. सकाळच्या वेळेत ते महाल येथील स्व. भाऊजी दफतरी (नागपूर नाईट हायस्कूल) येथील मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी त्यांच्या सोबत संघाचे माजी सरकार्यवाह व कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते. मतदानासाठी सर्वात आधी केंद्रावर पोहोचून दोघांनीही आपले कर्तव्य पार पाडले.
मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. भागवत यांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य असून जनहिताचा विचार करून योग्य उमेदवाराची निवड करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून मतदानाबाबत जनजागृती केली जाते आणि समाजानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नोटाऐवजी योग्य उमेदवार निवडण्याचा संदेश
नोटाच्या वापराबाबत बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, नोटा म्हणजे सर्व उमेदवारांना नकार देणे असले तरी प्रत्यक्षात उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्तम निवडणे हेच अधिक योग्य आहे. अराजक म्हणजे राजा नसणे आणि अशी स्थिती समाजासाठी सर्वात वाईट असते, असे महाभारतातही सांगितले आहे. त्यामुळे उपलब्ध पर्यायांमधून योग्य आणि सक्षम उमेदवाराची निवड करणे महत्त्वाचे असून, नोटाचा वापर केल्यास अप्रत्यक्षपणे नको असलेल्या शक्तींनाच मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.