मुंबई,
duplicate voter in Dadar राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर पहाटेपासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत. अशा वातावरणात मुंबईत पहिल्यांदाच दुबार मतदार आढळून आल्याची महत्त्वाची घटना समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू आक्रमक झाले होते. दुबार मतदार आढळल्यास त्याला तिथेच थांबवण्याचे स्पष्ट निर्देश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर दादर येथील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मुंबईतील पहिला दुबार मतदार सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या वॉर्डमधील मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावला. मतदान केंद्रावर ते पोहोचले असता मतदार यादीत दुबार नाव असलेली एक महिला मतदार आढळून आली. संबंधित महिलेला तत्काळ थांबवण्यात आले असून तिचे आधारकार्ड तपासल्यानंतर प्रतिज्ञापत्र भरून घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकारासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार प्रीती पाटणकर यांच्यात थेट लढत होत आहे. दुबार मतदाराचा मुद्दा समोर आल्याने या लढतीला आणखी रंग चढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यभरात ६४ हजार ३७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ४,५०० स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत. मतदान यंत्रांची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील दोन केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. विक्रोळीतील गोदामात १०,८०० कंट्रोल युनिट आणि १३,५०० बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहेत, तर कांदिवली येथे ९,२०० कंट्रोल युनिट आणि ११,५०० बॅलेट युनिट साठवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.