मुंबई,
Election Commission : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान मतदारांच्या बोटांवर लावल्या जाणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई मार्करद्वारे लावली जात असून ती लगेच पुसली जाते, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. तसेच या निवडणुकीत पहिल्यांदाच मार्करचा वापर करण्यात येत असल्याचे आरोपही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
वाघमारे यांनी स्पष्ट केले की, राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केलेलीच विशिष्ट प्रकारची शाई या निवडणुकीत वापरण्यात आली आहे. या शाईमध्ये कोणताही वेगळा घटक मिसळलेला नाही. तसेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २०११ पासून मार्करचा वापर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. बोटावर लावलेली शाई सुकण्यासाठी साधारण १० ते १२ सेकंद लागतात आणि या कालावधीत मतदार मतदान केंद्रातच असतो. एकदा शाई वाळल्यानंतर ती सहज काढता येत नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.
मतदारांच्या बोटावरील शाई पुसत असल्याचे व्हिडीओ आणि दावे हे ‘फेक नरेटिव्ह’चा भाग असल्याचे सांगत, अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांवर आणि चुकीची माहिती पसरवणारे व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही निवडणूक आयुक्तांनी दिला. दरम्यान, मार्करच्या वापराबाबत मिळालेल्या अनुभवाच्या आधारे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मार्करऐवजी पारंपरिक शाईचा वापर केला जाईल, असेही दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.