नाशिक,
EVM malfunction in Nashik नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी सुरुवातीलाच काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पहिल्याच टप्प्यात मतदान काही काळासाठी ठप्प झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली, तर मतदानासाठी आलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी आज मतदान होत असून यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी आधीच पूर्ण केली होती. कालच मतदान यंत्रे आणि कर्मचारी सर्व मतदान केंद्रांवर पोहोचले होते. मतदान प्रक्रिया निर्भय आणि सुरळीत पार पडावी यासाठी शहरभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष मतदान सुरू होताच काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला.
शहरातील प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रातील खोली क्रमांक दोनमध्ये असलेले ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. जवळपास अर्धा तास मशीन सुरू न झाल्याने त्या केंद्रावरील मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. सकाळी लवकर मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावरच ताटकळत थांबावे लागले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत तांत्रिक अडचण दूर केली आणि मशीन पुन्हा सुरू केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
याच दरम्यान, नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूल येथील खोली क्रमांक आठमध्येही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या मतदान केंद्रावर सकाळच्या वेळेत बराच काळ मतदान सुरू होऊ शकले नाही. तांत्रिक कारणांमुळे मतदान प्रक्रियेला विलंब लागला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी बिघाड दूर केल्यानंतर तेथील मतदानही पुन्हा सुरू करण्यात आले. दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ६ लाख ५६ हजार ६७५ महिला मतदार, तर ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शहरात एकूण १,५६३ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाने मागील काही दिवसांत व्यापक जनजागृती मोहीम राबवली होती. सकाळच्या तासांत काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे मतदान रखडले असले तरी उर्वरित मतदान केंद्रांवर शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू असल्याचे चित्र आहे.