‘तू इथे चांगला पैसा कमावतोस, या भागात धंदा करायचा असेल तर...'

15 Jan 2026 20:02:00
पिंपरी,
extortion-deadly-attack : अवघ्या ५० रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने एका तरुणाच्या जीवावर उठत त्याच्या अंगावर वाहन घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत परिसरातील एका चहा टपरीवर मंगळवारी (दि. १३ जानेवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
 

pune 
 
 
 
विनोद ऊर्फ विन्या निजप्पा गायकवाड (२७, रा. रमाबाईनगर, रावेत), अक्षय प्रभाकर साबळे (३२, रा. काळभोरनगर, आकुर्डी) आणि भूषण भोसले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात मयूर अशोक लोखंडे (३०, रा. रुपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी; मूळ रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी बुधवारी (दि. १४) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर लोखंडे हे भंगार वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी ते रावेतमधील एका चहा टपरीवर चहा पिण्यासाठी बसले असताना विनोद गायकवाड त्याठिकाणी आला. ‘तू इथे चांगला पैसा कमावतोस, या भागात धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे,’ अशी मागणी त्याने केली. मात्र मयूर यांनी पैसे देण्यास नकार दिला.
 
यानंतर संतप्त झालेल्या संशयितांनी मयूर यांना शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारहाण केली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. पुढे आरोपींनी त्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0