‘आम्हालाच धावपळ, मग सामान्यांचे काय?

15 Jan 2026 10:01:56
नवी मुंबई,
Ganesh Naik couldn't find polling station राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक विशेष चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय तणावामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना आमनेसामने असल्याने वातावरण आधीपासूनच तापलेले असताना, मतदानाच्या दिवशीही नवी मुंबईत गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले.
 
 

ganesh naik 
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक मतदानासाठी घराबाहेर पडले असता त्यांना मतदान केंद्रच सापडत नसल्याचा प्रकार घडला. सुरुवातीला ते सेंट मेरी शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले, मात्र तेथे मतदान नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते मनपा सीबीएसई शाळेत गेले असता, पुन्हा त्यांना सेंट मेरी शाळेतच मतदान असल्याचे सांगण्यात आले. एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागल्याने गणेश नाईक चांगलेच संतप्त झाले. निवडणूक आयोगाचे योग्य नियोजन नसल्याची तीव्र टीका करत त्यांनी, “आम्हालाच इतकी धावपळ करावी लागत असेल, तर सामान्य मतदारांचे काय हाल होत असतील?” असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, मतदानाच्या आदल्या रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक नवी मुंबईत दाखल झाले होते. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेला भेट देणे आणि उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी शहरात उपस्थिती लावली. वाशी, घणसोली आणि ऐरोली परिसरात घडलेल्या शिवसेना-भाजप वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापले.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी माध्यमांनी गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेंच्या रात्रीच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “काही लोकांच्या झोपा खराब झाल्या आहेत, म्हणून ते शैतानासारखे इकडे-तिकडे भटकत आहेत,” असे म्हणत गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या घडामोडींमुळे नवी मुंबईतील निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
Powered By Sangraha 9.0