अजित पवारांच्या सूचनेनुसार माळेगावमध्ये बिनविरोध निवड

15 Jan 2026 20:25:11
माळेगाव,
malegaon-nagar-panchayat : माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या मासिक सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतीतील उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी पार पडल्या.
 
 
 
vrushali-tavare
 
 
निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी वृषाली तावरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. या अर्जाला नगरसेविका दीपाली अनिकेत बोबडे यांनी सूचक तर वैभव धर्मेंद्र खंडाळे यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने वृषाली तावरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगरपंचायतीतील सर्व नगरसेवकांनी गटातटाचे राजकारण टाळत ‘अजित पवार हाच गट’ मानून बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवली.
 
वृषाली तावरे यांनी यापूर्वी २०१५ ते २०२० या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या कुटुंबाला स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामाचा वारसा असून त्यांचे चुलत सासरे वसंत बाबुराव तावरे यांनी २००५ मध्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता. पक्षनिष्ठा व एकनिष्ठतेचे फळ त्यांना मिळाल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये होती.
 
याच सभेत गटनेते म्हणून जयदीप तावरे यांनी अॅड. राहुल तावरे व किरण खोमणे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर केली. तसेच गट उपनेतेपदी साधना वाघमोडे आणि पक्ष प्रतोदपदी धैर्यशील तावरे यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा सत्कार नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
 
निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि जंगी मिरवणूक काढून आनंद साजरा केला. यावेळी वसंतराव तावरे, किरण खोमणे, नगराध्यक्ष सुयोग सातपुते, प्रतोद धैर्यशील तावरे आणि गटनेते जयदीप दिलीप तावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
 
उपनगराध्यक्ष वृषाली तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगावचा सर्वांगीण आणि चौफेर विकास साधण्याचा संकल्प व्यक्त केला. महिलांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले. स्वीकृत नगरसेवक अॅड. राहुल तावरे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलून मिळालेल्या संधीचे सोने करू, असा विश्वास व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0