पुणे,
Pink polling station : महापालिका निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने शहरात एकूण १६ पिंक मतदान केंद्रांची उभारणी केली होती. या केंद्रांवर सकाळपासूनच महिलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. सकाळी ७.३० वाजताच अनेक मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष बाब म्हणजे या पिंक बूथचे संपूर्ण व्यवस्थापन महिला अधिकाऱ्यांच्या हातात होते.
शहरातील सुशिक्षित तरुणी, गृहिणी तसेच ज्येष्ठ महिलांमध्ये या मतदान केंद्रांबाबत विशेष आकर्षण पाहायला मिळाले. महिलांना मतदान करताना सुरक्षित, सुसह्य आणि आनंददायी वातावरण मिळावे, यासाठी मतदान केंद्रांना पूर्णपणे गुलाबी रंगसंगतीत सजवण्यात आले होते. केंद्राबाहेर गुलाबी कापड, फुगे, महिलांच्या सक्षमीकरणाचे संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढून स्वागतार्ह वातावरण तयार करण्यात आले होते.
या पिंक बूथवर ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रांगेत उभे न राहता थेट मतदानाची मुभा दिल्यामुळे अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले. मतदानानंतर आठवण म्हणून फोटो काढता यावा, यासाठी खास सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वच जणींनी उत्साहाने सेल्फी घेतले.
महिलांना कोणताही संकोच न वाटता निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी सुरक्षेसह सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. पिंक बूथमुळे महिलांचा मतदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाल्याचे दिसून आले. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणी आणि ज्येष्ठ महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढल्याने पिंक मतदान केंद्रांचा उपक्रम यशस्वी ठरल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळाले.