पुणे,
pune-municipal-corporation-election पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मतदार यादीतील एका गंभीर त्रुटीमुळे एका ज्येष्ठ नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागल्याची घटना समोर आली आहे. मतदार यादीत नाव बरोबर असतानाही त्यासमोर चक्क एका महिलेचा फोटो छापला गेल्याने संबंधित मतदाराची ओळखच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. हा प्रकार सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होत आहे.
पुण्यातील ६५ वर्षांवरील रवींद्र हे उत्साहाने मतदानासाठी केंद्रावर दाखल झाले. यादी तपासताना त्यांचे नाव योग्य असल्याचे आढळले, मात्र त्यासमोर असलेला फोटो एका अनोळखी महिलेचा असल्याचे पाहून ते हादरले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली; मात्र सुरुवातीला ठोस उत्तर मिळाले नाही. या चुकीमुळे मतदान नाकारले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने रवींद्र यांनी घरी जाऊन आधार कार्ड आणले. pune-municipal-corporation-election अधिकृत ओळखपत्र सादर केल्यानंतरच अधिकाऱ्यांना चूक लक्षात आली आणि त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली.
या घटनेचा उल्लेख करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक यंत्रणेवर थेट टीका केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सोशल मीडियावर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत—रवींद्र नावासमोर महिलेचा फोटो लावून मतदाराची ओळखच पुसली गेली आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रेच गायब आहेत, तर काही ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करणारे कोणी नाही. pune-municipal-corporation-election त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा केला. “ही फक्त शाई पुसली जात नाही, तर लोकशाहीच पुसली जात आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यभरातील ८९३ वॉर्डांमधील २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून १५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. एकूण ३ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत असून, अशा घटनांमुळे निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.