न्यूयॉर्क,
Trump's immigration bomb अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक आणि कठोर धोरणांचा अवलंब करत मोठा निर्णय घेतला आहे. रशिया, इराण, पाकिस्तानसह तब्बल ७५ देशांच्या नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा देण्यावर बंदी घालण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. हे निर्बंध २१ जानेवारीपासून लागू होणार असून अनिश्चित काळासाठी ते अंमलात राहणार आहेत. मात्र या यादीत भारताचा समावेश नसल्याने भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर आणि इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने इमिग्रेशन धोरण अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील सार्वजनिक आणि कल्याणकारी सेवांवर अवलंबून राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर नियंत्रण ठेवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ७५ देशांमधून येणाऱ्या व्हिसा अर्जांना नकार देण्याचे निर्देश दिले आहेत.

फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, अमेरिकन दूतावासांना सध्याच्या कायद्यांचा आधार घेत व्हिसा अर्ज नामंजूर करण्यास सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जानेवारीत पदभार स्वीकारल्यानंतर व्यापक इमिग्रेशन मोहीम सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता अमेरिका व्हिसा अर्ज तपासणी आणि चौकशी प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करणार आहे. या बंदीच्या यादीत इराण, रशिया, अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, ब्राझील, सोमालिया, येमेन, थायलंड आणि पाकिस्तानसारख्या देशांचा समावेश आहे. सोमालिया हा देश यापूर्वीपासूनच अमेरिकन अधिकाऱ्यांच्या लक्षात असून, सुरक्षा आणि सार्वजनिक सेवांवरील अवलंबनाच्या कारणामुळे त्याला उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांच्या मते, अमेरिका आपल्या जुन्या अधिकारांचा वापर करून सार्वजनिक सेवांवर अवलंबून राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जगभरातील अमेरिकन उच्चायुक्तांना इमिग्रेशन कायद्यातील ‘पब्लिक चार्ज’ तरतुदीनुसार नव्या स्क्रीनिंग नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जे व्हिसा अर्जदार भविष्यात अमेरिकेच्या कल्याणकारी किंवा सार्वजनिक सेवांवर अवलंबून राहू शकतात, अशा अर्जदारांचे व्हिसा अर्ज थेट नामंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या ७५ देशांच्या यादीत अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, रशिया, इराण, नायजेरिया, सोमालिया, सीरिया, सुदान, थायलंड, येमेनसह आफ्रिका, आशिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांचा समावेश आहे. मात्र भारत या यादीत नसल्याने भारतीय नागरिकांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे जागतिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली असून, अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.