नागपूर,
Voting has begun in Nagpur
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून शहरात एकूणच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असून नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, काही ठिकाणी मतदान केंद्र घरापासून दूर असल्याने तसेच मतदार यादीत नाव आढळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा आणि नाराजीचे सूर उमटत आहेत.
काही मतदारांनी मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली असून, मतदार यादीतील त्रुटींमुळे वेळ वाया जात असल्याचे सांगितले जात आहे. जेआरके कॉन्व्हेंट, आराधना नगर येथे मतदान प्रक्रिया अद्यापही सुरू नाही, असे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील वनिता विकास शाळा केंद्रावरील एका मशीनमध्ये ‘क’ आणि ‘ड’ उमेदवारांची नावे एकाच यादीत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ईव्हीएम मशीन बदलून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक २ आणि ३ मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या चर्चा सुरू असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
याचबरोबर निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या ड्युटी काल सायंकाळी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे त्यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले. आज ते लक्ष्मी नगर झोनवर मतदानासाठी आले असता पोस्टल बॅलेट बंद असल्याचे आढळले. प्रशासनाने सायंकाळी पाच नंतर पोस्टल मतदान करता येईल असे सांगितले, परंतु एम्प्लॉयींच्या ड्युटी रद्द झाल्यामुळे लक्ष्मी नगर झोनमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. याचदरम्यान, अयोध्यानगर परिसरात काँग्रेसच्या उमेदवाराच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना समोर आली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. ही आग घातपाताचा प्रकार आहे की एखादी अपघाती घटना, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. एकीकडे मतदानाचा उत्साह तर दुसरीकडे तांत्रिक अडचणी, पोस्टल बॅलेटवरील गोंधळ आणि आग लागण्याची घटना यामुळे नागपूरमधील निवडणूक प्रक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.