पनवेल,
BJP in Panvel Municipal Corporation मुंबई, पुणे आणि नवी मुंबईसह आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतमोजणी सुरु आहे. निकालाचे आकडे हाती येण्यापूर्वीच पनवेलमध्ये भाजपाला मोठं यश मिळाले आहे. पनवेल महानगरपालिकेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यापैकी सहा उमेदवार भाजपचे आहेत तर एक अपक्ष महिला उमेदवार बिनविरोध निवडून आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सातही उमेदवारांना बिनविरोध म्हणून जाहीर करण्याचा आदेश महापालिकेच्या प्रशासनाला दिला आहे.

बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये ममता प्रितम म्हात्रे (भाजप) – जागा क्र. १८-अ, नितीन जयराम पाटील (भाजप) – जागा क्र. १८-ब, स्नेहल स्वप्नील (अपक्ष) – जागा क्र. १८-क, दर्शना भगवान (भाजप) – जागा क्र. १९-अ, रुचित गुरुनाथ अलोंढे (भाजप) – जागा क्र. १९-ब, अजय तुकाराम बहिरा (भाजप) – जागा क्र. २०-अ, प्रियंका तेजस कांडपीळे (भाजप) – जागा क्र. २०-ब यांचा समावेश आहे. पनवेलमध्ये २०१७ मध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. त्या वेळी महापालिकेतील ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक भाजपचे होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना-शिंदे गटासोबत युती केली असून, दोन्ही पक्ष एकत्र येऊन मैदानात उतरलात. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला पनवेलमध्ये एकही जागा मिळाली नव्हती, परंतु यावेळी युतीमुळे दोन्ही पक्षांच्या विजयाची शक्यता वाढली आहे.
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली आहे आणि त्यामुळे पुन्हा भाजपचा महापौर पनवेल महापालिकेत बसेल असा त्यांचा विश्वास आहे. पनवेल महापालिकेत ग्रामीण व शहरी भाग समाविष्ट असून, पाणी, गटारे आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या समस्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. मतमोजणीपूर्वीच महायुतीची त्सुनामी राज्यात पाहायला मिळत आहे, कारण ६९ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. या यशामुळे भाजप-शिवसेना युतीस राज्यभरातील निवडणूक प्रक्रियेत प्राथमिक आघाडी मिळाली आहे.