नवी दिल्ली,
BJP National Presidency भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुकीची अधिसूचना अधिकृतरित्या जारी झाली असून ही निवडणूक प्रक्रिया पाच दिवस चालणार आहे. याआधी भाजपने नितीन नबीन यांची पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नितीन नबीन यांची अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित होईल, अशी अपेक्षा आहे. भाजपच्या इंस्टाग्राम हँडलवर माहिती शेअर करताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या 'संघटन महोत्सव'च्या भाग म्हणून, राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक प्रक्रिया १९ जानेवारी रोजी सुरू होईल आणि २० जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल.
भाजपाने सांगितले की, मतदार यादी १६ जानेवारी रोजी प्रकाशित केली जाईल, नामांकन प्रक्रिया १९ जानेवारी रोजी होईल, तर मतदान २० जानेवारी रोजी होईल. यादीतील सर्व माहिती वेळेवर शेअर करण्यात आली आहे. नितीन नबीन हे बिहारमधील अनुभवी नेते असून भाजपशी संबंधित आहेत. ते पाटण्यातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि बिहारमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांची संघटनेवर मजबूत पकड असून ते विधानसभेत प्रभावी नेता म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यावर नितीन नबीन यांनी म्हटले, मी केंद्रीय नेतृत्व, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय नेतृत्वातील सर्वांचे अभिनंदन करतो की त्यांनी मला ही संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नितीन नबीन यांचे कार्यकारी अध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.