वनविभागाने १२० प्रकरणांत ठोठावला ३.७४ लाखांचा दंड
वर्धा,
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे आणि पर्यायाने निर्सगाचे महत्त्व अधोरेखित केले. पण, सध्या विकासाच्या नावाखाली तसेच घराच्या आवारात पानांचा कचरा होत असल्याचे कारण पुढे करीत डेरेदार वृक्ष तोडण्याचा सपाटा लावल्या जात आहे. एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या २० महिन्यांच्या काळात जिल्ह्यात felling of trees तब्बल ८५१ वृक्षांची विना परवागी कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यातील १२० प्रकरणांत ३ लाख ७४ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

शासन, प्रशासन आणि समाजातीत विविध स्तरावरून वृक्षाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शिवाय वृक्ष लागवड व लावण्यात आलेल्या रोपट्यांचे संगोपन व्हावे यासाठी सामाजिक संघटनांकडून विशेष प्रयत्नही होत आहेत. असे असले तरी एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वनविभागाने अवैध felling of trees वृक्ष कत्तली संदर्भात १६८ वन गुन्ह्याची नोंद घेतली आहे. या १६८ प्रकरणांमध्ये ८५१ वृक्ष कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याचे वनविभागाच्या चौकशीत पुढे आले आहे. १२० प्रकरणं निर्लेखित करून १५ आरोपींवर ३ लाख ७४ हजार ३३२ रुपयांचा दंड ठोठावला आहे. एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या काळात जिल्ह्यात ८५१ वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. यात ५२६ साग प्रजातीची तर ३२५ आडजात प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे.