तेहरान,
Iran postponed executions of 800 people इराणमध्ये सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना दररोज नवे वळण मिळत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही तणाव वाढलेला दिसत आहे. इराणी निदर्शकांवरील अत्याचार थांबवले नाहीत, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिका सातत्याने देत आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी व्हाईट हाऊसकडून एक महत्त्वाचा दावा करण्यात आला असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे इराणने तब्बल ८०० जणांची फाशी पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयानंतर अमेरिका सध्या इराणवर थेट हल्ला करणार नाही, मात्र भविष्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या इराणमध्ये असंतुष्ट नागरिकांच्या हत्या आणि फाशी थांबवण्यात आल्या आहेत. मात्र भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या कारवाया झाल्यास खामेनी राजवटीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा ठाम इशाराही अमेरिकेने दिला आहे. अमेरिका आक्रमणापासून सध्या मागे हटली असली, तरी परिस्थिती बिघडल्यास कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही संकेत देण्यात आले आहेत.
लेविट यांनी पुढे स्पष्ट केले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. इराणी अधिकाऱ्यांकडून फाशी आणि हत्या थांबवण्याबाबत अमेरिकेला आश्वासन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तात्पुरता संयम दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयामागे कतार, सौदी अरेबिया आणि ओमान या मित्र राष्ट्रांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे. या देशांनी अमेरिकेला सध्या तरी इराणवर हल्ला न करण्याचा सल्ला दिला आणि राजनैतिक मार्गाने परिस्थिती हाताळण्यावर भर दिला. त्यामुळे इराणविरोधातील तात्काळ लष्करी कारवाई टळली असली, तरी पश्चिम आशियातील तणाव अद्याप कायम असून पुढील घडामोडींवर जगाचे लक्ष लागून राहिले आहे.