वेध
रेवती जोशी-अंधारे
9850339240
love insurance ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ ही ओळ आयुर्विम्याची आठवण करून देते. गेल्या काही वर्षांत विशेषत: कोरोनानंतर जीवनाची काही शाश्वती नसल्याची जाणीव नव्याने आणि प्रकर्षाने आपल्याला झाली. आयुर्विम्यासोबतच आरोग्य विमा, अपघात विमा, पीक विमा, काही मॉडेल्सच्या सुंदर डोळ्यांचा, लांबसडक बोटांचा विमा असे अनेक प्रकार चलनात आहेत. पण, परस्परांविषयीच्या प्रेमाचा विमा काढण्याचीसुद्धा वेळ आली आहे. चीनमध्ये एका युवतीने 10 वर्षांपूर्वी काढलेल्या ‘लव्ह इन्शुरन्स’वर आता क्लेम केला आणि हा विषय चर्चेत आला.

या क्लेममध्ये तिला गुलाबाची 10 हजार फुले किंवा तेवढी रोख रक्कम देण्याचे निर्धारित आहे. व्यावहारिक दृष्टीने 10 हजार गुलाब फुले ठेवण्याचा प्रश्न असल्यामुळे तिने कंपनीला रोख रक्कम मागितली. भारतीय चलनानुसार तिला 1 लाख 25 हजार रुपये मिळाले आहेत. या पॉलिसी अंतर्गत प्रियकर आणि प्रेयसीने लग्नापूर्वी आपल्या प्रेमाचा विमा काढायचा असतो. त्या तारखेच्या 3 वर्षांनंतर आणि 10 वर्षांच्या आत, ते जोडपे विवाहबद्ध झाल्यास विमा क्लेम करता येईल. या क्लेममध्ये 10 हजार गुलाब फुले, हृदयाच्या आकाराची 0.5 कॅरेट हिऱ्याची अंगठी किंवा रोख रक्कम मिळू शकते.
प्रेमाची भेट म्हणून आपल्या जोडीदाराला हा विमा काढून भेटीदाखल देण्याची टूम चीनमध्ये निघाली होती. कधी काळी सुदृढ कुटुंब व्यवस्था असलेल्या पण सध्या पाश्चिमात्यांचा वारा लागलेल्या चिनी युवावर्गाला, प्रामाणिकपणे एकाच नात्यात बांधून ठेवण्यासाठी या विम्याचा उपयोग नक्कीच झाला. अगदीच कमी पैशांत मिळणारा हा विमा नात्याप्रती अमूल्य बांधिलकी नक्कीच देत होता. यात गंमत अशी की, जोडप्याने प्रामाणिकपणे सोबत राहावे आणि विवाह करून नात्याला पूर्णत्व देणे अपेक्षित आहे. चीनमध्ये युवा लोकसंख्येची समस्या लक्षात घेता, अशा मार्गांनी नातं आणि पर्यायाने कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्या देशात विवाहाचं बंधन नको, प्रजोत्पादनाची काळजी नको, पेट पॅरेंटींग, डबल इन्कम नो किड्स असे ट्रेन्ड्स बèयापैकी रुजले आहेत. आपल्याही देशातील तरुणाई यात मागे नाहीच. मात्र, लव्ह इन्शुरन्स आणि त्यानंतर आलेला विवाह विमा या दोन्ही पर्यायांचा छान गैरवापर करून चीनच्या युवावर्गाने विमा कंपनीला दिवाळखोर केले. विमा कंपन्यांनी या दोन्ही प्रकारचे विमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ज्यांचा आधीच विमा काढून झाला आहे ती जोडपी मात्र क्लेम करत आहेत.
योगायोग म्हणजे आपल्या देशातही प्रेमी युगुलांचा उत्सव सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे मकर संक्रांतीनिमित्त एक अनोखा जोडप्यांचा मेळावा होतो. बांद्याच्या केन नदीत पवित्र स्नान करून, ही जोडपी 650 वर्षे जुन्या भुरागड किल्ल्यात जातात आणि आपले प्रेम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करतात. असं म्हणतात की, तिथल्या राजकन्येचं नाचगाणं करणाऱ्या नटासोबत प्रेम जुळलं. राजाला हे कळताच त्याने एक विचित्र अट त्या युवकापुढे ठेवली. केन नदीच्या दोन्ही टोकांवर दोर बांधण्यात आला. युवकाने त्या दोरावर चालत नदी ओलांडली तर राजकन्येसोबत त्याचा विवाह होणार.love insurance प्रेमाच्या भरात तो दोरावर चालत अर्ध्या अंतरावर पोहोचलासुद्धा! राजाने दुष्टपणे सेवकाला सांगून, एका बाजूने दोर कापला. तरुण नदीत पडून बुडला. राजकन्येचं नंतर काय झालं? याचा उल्लेख आढळत नाही. पण, अमर प्रेमाचं प्रतीक म्हणून युवा नट अजरामर झाला.
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात याच किल्ल्यात शेकडो क्रांतीकारकांना देशप्रेमाच्या आरोपावरून फाशी देण्यात आली.
भुरागडच्या प्राचीन किल्ल्यात, प्रेमीयुगुलांनी जाऊन केलेली प्रार्थनासुद्धा एक प्रकारचा ‘विमा’च आहे. प्रेमाचा विमा हे खूपच फिल्मी वाटत असलं तरी, नातं टिकविण्यासाठी असा विमा काढणे ही काळाची गरज झाली आहे. कुटुंब व्यवस्थेचा आदर्श असलेल्या आपल्या समाजातील सर्वच प्रेमळ नात्यांची वीण उसवत चालली आहे. ती घट्ट ठेवण्यासाठी कोर्टात चालणाèया कोरड्या खटल्यांपेक्षा, प्रेमळ संवादाचा आणि आश्वासक स्पर्शाचा ‘लव्ह इन्शुरन्स’ जास्त महत्त्वाचा आणि अपेक्षित परिणाम देणारा आहे.
अगदी कालपरवापर्यंत कोणाचीतरी मान्यता नाही म्हणून एखाद्याच्या प्रेमाला संपविण्याच्या घटना घडल्यात आणि घडत आहेत. प्रेम...राष्ट्रावरचे, समाजमान्यता नसलेले, कला-साहित्यावरचे, वृद्ध माता-पित्यांवरचे, प्राणी-पक्ष्यांवरचे पण, ते संपविणारी अदृश्य शक्ती सदोदीत कार्यरत असते. चीनमध्ये बंद करण्यात आलेला हा ‘लव्ह इन्शुरन्स’ आपण आपल्यापुरता सुरू करायला काय हरकत आहे?
..........