नवी दिल्ली,
Pakistani boat in Indian territory भारताच्या समुद्र सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एखाद्या दहशतवादी कारवाईचा डाव रचला जात होता का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण भारतीय तटरक्षक दलाने समुद्रमार्गे घुसखोरी करण्याचा एक मोठा कट उधळून लावत पाकिस्तानची ‘अल मदीना’ नावाची बोट भारतीय हद्दीतच ताब्यात घेतली आहे. या बोटीतून भारताच्या समुद्र सीमेत प्रवेश करणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानकडून समुद्रमार्गे घुसखोरी करून दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न तर नव्हता ना, याचा सखोल तपास भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.

याआधी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करून काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या गोळीबारात २० पेक्षा अधिक भारतीयांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानवर एअर स्ट्राइकचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
गुजरातजवळील अरबी समुद्रात १४ जानेवारीच्या मध्यरात्री भारतीय तटरक्षक दलाची बोट नियमित गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. अंधाराचा फायदा घेत एक बोट अत्यंत शांतपणे भारतीय समुद्र हद्दीत प्रवेश करत असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. ही केवळ मासेमारी करणारी बोट नसून त्यातील लोकांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात येताच तटरक्षक दलाने तत्काळ पाठलाग सुरू केला. भारतीय जवान जवळ येताच संबंधित बोटीने पाकिस्तानच्या दिशेने माघार घेण्याचा आणि वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि ‘अल मदीना’ ही पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान बोटीत असलेल्या नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना गुजरातच्या पोरबंदर येथे आणले जात आहे. भारताची समुद्र सीमा अभेद्य असून कोणतीही घुसखोरी सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून आयबी, रॉ आणि एटीएससह विविध केंद्रीय सुरक्षा यंत्रणा या नऊ जणांची कसून चौकशी करत आहेत. या बोटीमागे नेमका काय उद्देश होता, दहशतवादी कारवाईची शक्यता होती का आणि यामागे कोणते आंतरराष्ट्रीय नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.