आज दिसणार महायुतीची जादू

16 Jan 2026 05:30:00
मोरेश्वर बडगे
devendra fadnvis हा लेख तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा महापालिका निवडणूक निकालाचे कल यायला सुरुवात झालेली असेल. तुम्हाला उत्सुकता असेल. कोण येणार? साहजिक आहे. कित्येक वर्षांनंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. काही महापालिकांमध्ये तीन-चार वर्षांनंतर तर मुंबई महापालिकेत आठ वर्षांनंतर निवडणुका झाल्या आहेत. मतदारांची पिढी बदलली आहे. राजकारणही बदललं आहे. या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले. सारंच बदललं आहे. हा बदललेला मतदार कसा वागेल, हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे उत्सुकता नक्कीच ताणली गेली असणार. त्यात भर म्हणजे या वेळच्या महापालिका निवडणुका एकदम वेगळ्या होत्या. यंदाचं इलेक्शनच विचित्र होतं. तंगड्यात तंगड्या. कोण कोणासोबत आहे कळत नव्हतं. ‘वेगळे लढा. मात्र निकालानंतर तिघांनाही एकत्र यायचं आहे’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच सांगून टाकले होते. त्यामुळे महायुतीतही मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले दिसले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार आपल्या काकाच्या सोबतीने भाजपाच्या विरोधात लढले.
 
 
 
देवेंद्र फडणवीस
 
 
पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत एका मंचावर आले. मात्र या दोन चुलत भावांनी निवडणूक युती जाहीर करायला उशीर लावला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. म्हणूनच यावेळी बंडखोरांची संख्या मोठी दिसते. आज निकाल लागणार असले, तरी जय-पराजयाचे अंतिम चित्र स्पष्ट व्हायला चार दिवस लागतील. मतदान 50 टक्क्याच्या वर झाले तर सत्ताधारी महायुतीला फायदा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, लिहून ठेवा. एकूण 29 महापालिकांचे निकाल येणार आहेत. त्यातल्या किमान 25 महापालिकांमध्ये महायुती विजयी झालेली दिसेल. नागपुरात भाजपा चौका मारेल. यात आश्चर्याचा धक्का बसण्यासारखे काही नाही. मतदारांनी ते आधीच ठरवलेलं होतं. 14 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. विधानसभा निवडणुकीत भाजपाला 29 टक्के मतं मिळाली तर शिंदे सेनेला 17 टक्के मतं होती. उद्धव ठाकरे यांच्या उबाठाला फक्त 23 टक्के. महायुती आणि उबाठा यांच्या मतांमधला फरक 16 टक्के आहे. दोन महिन्यांपूर्वी नगर परिषद निवडणुकीत लोकांनी महायुतीला उचलून धरले. तीच स्टोरी आता रिपीट होणार आहे. महापालिका निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होत असल्या, तरी वर्षभरात मतदारांची मतं फारशी बदलत नाहीत. त्यांनी बदलावे असे काही घडलेही नाही. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीत महायुतीला उचलून धरणारा मतदार महापालिकेतही तिच्यासोबत दिसेल.
29 महापालिकांसाठी निवडणुका झाल्या असल्या, तरी चर्चा मुंबईचीच झाली. मुंबईची महापालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका आहे. तिचे वर्षाचे बजेट 75 हजार कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातल्या साऱ्या महापालिकांचे बजेट एकत्र केले तरी ते एवढे होत नाही. चेन्नई महापालिकेचे बजेट अवघे 9 हजार कोटी रुपये आहे. एका अर्थाने मुंबई महापालिका ही सोन्याची कोंबडी आहे. त्यामुळे साèयांच्या नजरा मुंबईवर होत्या. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेले अजित पवार पुण्यात वेगळे लढल्याने तिकडची थोडी चर्चा झाली. मात्र सारा फोकस मुंबईने नेला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी तर ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई होती. ठाकरे बंधूंनी नेहमीप्रमाणे मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेचा मुद्दा पुढे केला. मराठीच्या नावाने मुंबईकरांना भावनात्मक साद घातली. त्या शिवाय ठाकरेंना दुसरा पर्याय नव्हता. मतदारांना दाखवण्यासारखे कुठलेही काम केलेले नाही.devendra fadnvis त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ऐकायला मिळते तेच रडगाणे यावेळीही ऐकायला मिळाले. पिढीजात सत्ता जाण्याच्या भीतीने ठाकरे बंधू एकत्र आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विकासाच्या अजेंड्यावर मतं मागितली. ठाकरे विकासाची भाषा करूच शकत नाहीत. त्यांच्याकडे दृष्टीच नाही. बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत ‘ठाकरे ब्रँड’ जोरात होता. मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासापायी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. तेव्हाच त्यांचे ‘बुरे दिन’ सुरू झाले. अडीच वर्षात मुख्यमंत्रिपद गेले. नंतरच्या लोकसभा निवडणुकीत ‘फेक नॅरेटिव्ह’ने साथ दिली. मात्र विधानसभा निवडणुकीत ते उघडे पडले. आता तर काँग्रेसनेही त्यांची साथ सोडली. शरद पवार काय ताकद देणार? त्यांनीच पुण्यात पुतण्याच्या कुबड्या घेतल्या. आपण एकटे पडलो याची कल्पना उद्धव यांना आली तेव्हा तब्बल 20 वर्षांनंतर भाऊ आठवला. राज ठाकरे यांच्याही नशिबी राजकीय वनवास आहे. एकही खासदार नाही, एकही आमदारच काय नगरसेवकही नाही. दोघेही भाऊ समदुःखी. एकत्र येण्यासाठी दोघांनी मराठीचे निमित्त शोधले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जात आहे हा नेहमीचा आरडाओरडा सुरू केला. ठाकरे कुटुंबाला कधीही स्वबळावर मुंबई महापालिका मिळविता आली नाही. खिचडी सरकारच आतापर्यंत चालले. शेवटच्या म्हणजे 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपापेक्षा फक्त दोन जागा जास्त मिळाल्या होत्या. ती तर फडणवीस यांची मेहरबानी. त्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी मनात आणले असते तर तेव्हाच मुंबई महापालिका भाजपाला ताब्यात घेता आली असती. फडणवीस यांच्या उदारपणाचा चुकीचा अर्थ ठाकरेंनी घेतला. ताळतंत्र सोडले. फडणवीसांना काय काय बोलले. कधी ‘फडतूस’ म्हणाले तर कधी ‘टरबूज’ म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तर ‘तू राहशील किंवा मी’ अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना आव्हान दिले. आज कोण संपले आणि कोण राहिले ते महाराष्ट्र पाहतो आहे. यावेळी त्यांनी चक्क फडणवीस यांचे आई-वडील काढले. मतदारांना हे अजिबात आवडलेले नाही.
राज ठाकरेंना सोबत घेणे उद्धव ठाकरेंना महागात पडले. शेवटच्या दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये अंगलट आली. परप्रांतीयांबद्दल राज ठाकरे यांचे ‘प्रेम’ जगजाहीर आहे. ते त्यांनी यावेळीसुद्दा दाखवले. हे सरकार हिंदी लादण्याच्या विचारात नाही. पण ‘हिंदी लादाल तर लाथ मारू’ असे राज म्हणाले. भाजपाच्या प्रचारासाठी तामिळनाडूचे भाजपाचे नेते के. अण्णामलाई आले होते. ‘मुंबई हे महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर आहे’ असे ते बोलले. राज ठाकरेंनी त्याचा इश्यू केला. अण्णामलाई यांना ‘रसमलाई’ म्हटले. मुंबईमध्ये सहा टक्के तामिळ मतदार आहेत. या साऱ्यांना दुखावून राज ठाकरेंनी काय साधले असेल? उद्योगपती गौतम अदानींना हे सरकार पायघड्या घालत आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. पण अदानींना काँग्रेसनेच वाढवले हे ते विसरतात. 2001 साली गुजरातमधील मुंद्रा बंदराच्या परवानग्या काँग्रेस सरकारनेच दिल्या आहेत. पुढे अदानी स्वकर्तृत्वाने वाढले.devendra fadnvis भावाला सोबत घेतल्याने मराठी मतं टिकतील, असा उद्धव यांचा अंदाज होता. मात्र, राज यांच्या सापळ्यात अडकून उद्धव यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले. विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतांनी ठाकरेंना साथ दिली होती. पण ते वातावरण उद्धव टिकवू शकले नाही. मुंबईतली मराठी मतं एकनाथ शिंदे यांची शिवसेना खाणार आहे. ठाकरेंना मतं देणार कोण? मतदार शहाणा झाला आहे. या साèया रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना मानले पाहिजे. त्यांनी साèया गटातटांना सांभाळले. संयम पाळला. तोल ढळू दिला नाही. विकासाच्या अजेंड्यावर मतं मागितली. अनावश्यक आश्वासनांचा मोह टाळला. विशेष म्हणजे मोदी-शाह यांच्या सभेशिवाय फडणवीसांनी मुंबईचा मंगलकलश आणण्याची हिंमत केली. फडणवीस यांचे राजकीय वजन वाढलं आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Powered By Sangraha 9.0