सुंदरगड,
Violence in Sundargarh ओडिशातील सुंदरगड शहरात संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्याच्या घटनेनंतर दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला असून त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संपूर्ण शहरात २४ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
सुंदरगडचे जिल्हाधिकारी शुभंकर महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य बाजारपेठेत उसळलेला हिंसाचार आता नियंत्रणात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी शहरभर कलम १६३ लागू करण्यात आले असून, अफवा पसरवू नयेत आणि त्यांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शहरात शांतता राखावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात शांतता समितीच्या माध्यमातून संबंधित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वृत्तानुसार, रीजेंट मार्केट परिसरात एका समुदायातील जमावाने महिला कल्याण केंद्राजवळील एका घराची तोडफोड केली. या घटनेदरम्यान जमावाने एका पिकअप व्हॅनला आग लावली, तसेच एका कार आणि स्कूटरचेही नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात अतिरिक्त पोलिस दल तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीआयजी ब्रजेश राय यांनी सांगितले की, सुंदरगडच्या मुख्य बाजारपेठेत संशयास्पद खाद्यपदार्थाच्या मुद्द्यावरून हिंसाचार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला दोन्ही समुदायांतील लोकांमध्ये चर्चा सुरू होती, मात्र अचानक परिस्थिती बिघडली आणि दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून हिंसाचार थांबवला आणि दोन्ही बाजूंशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात कलम १६३ लागू करण्यात आले असून सर्व प्रकारच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
तसेच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दहा प्लाटून सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून ते नागरिकांना शांतता राखण्याचे आणि परस्पर सहकार्याचे आवाहन करत आहेत. या घटनेनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता समितीची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे, अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.