नागपूरमध्ये कोणाची सत्ता? महानगरपालिकेचे निकाल आज जाहीर

16 Jan 2026 09:16:17
नागपूर,
Who is in power in Nagpur नागपूरमध्ये कोण जिंकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. १५१ जागांसाठी सुरू असलेल्या या महायुद्धाचे निकाल आज, १६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काल १५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आज त्याचा कौल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत राज्यभरातील सुमारे ३४.९ दशलक्ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांसह एकूण २,८६९ जागांसाठी एकाच टप्प्यात ही निवडणूक घेण्यात आली. ही भव्य प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्यभरात ३९ हजारांहून अधिक मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती.
 
  
 
Who is in power in Nagpur
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण ९९३ उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ५८५ पुरुष आणि ४०८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असून तब्बल २३६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यातील अनेक उमेदवार हे प्रमुख पक्षांचे बंडखोर असल्याने निकाल अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे.
 
जर मागील म्हणजेच २०१७ च्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीकडे पाहिले, तर त्या वेळी भाजपने १५१ पैकी तब्बल १०८ जागा जिंकत ऐतिहासिक बहुमत मिळवले होते. काँग्रेसला २९ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर बसपाला १०, शिवसेनेला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती. त्या निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ५३.७२ इतकी होती. त्यामध्ये पुरुष मतदारांचा सहभाग सुमारे ५.९० लाख तर महिला मतदारांचा सहभाग सुमारे ५.३४ लाख इतका होता. विशेष म्हणजे, त्या वेळी ९४,७५९ मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला होता. यंदा मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे नागपूरचा कौल कुणाच्या बाजूने जाणार, महायुती पुन्हा वर्चस्व सिद्ध करणार की महाविकास आघाडी धक्का देणार, याचे उत्तर काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0