शेतकरी मारहाण प्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

17 Jan 2026 19:27:19
वाशीम, 
agriculture-officer-suspended : वाशीम जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालुयातील गोगरी येथील शेतकर्‍याला मारहाण करणार्‍या कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. शासन स्तरावरुन हे निलंबन आदेश देण्यात आले. या अधिकार्‍याचे वर्तन शासकीय शिस्तीला धरुन नसून ते लोकसेवकाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
 
j
 
 
 
मंगरुळनाथ तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकर्‍याला मारहाण केल्याची घटना १३ जानेवारी रोजी गोगरी गावात घडली होती. त्या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते. अशा मग्रुर कृषी अधिकार्‍यावर कारवाईसाठी शेतकरी संघटनासह विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक भुमीका घेतली होती. फळबागाच्या मस्टरचे पैसे मिळाले नाही म्हणून गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रारी नंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी गावात गेले असता त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकरी ऋषिकेश पवार याला तालुका कृषी अधिकार्‍याने मारहाण केली होती. शेतकर्‍याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालून या अधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी केली होती. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कृषी विभागाने घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठाकडे अहवाल पाठविण्यात आला. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून, चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0