भौतिक संपन्न देशच विश्वाचे संचालन करू शकतो – भैय्याजी जोशी

17 Jan 2026 20:20:37
गोंदिया, 
bhaiyyaji-joshi : आजच्या जागतिक व्यवस्थेत केवळ नैतिकता, आदर्श किंवा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे कोणताही देश प्रभावी जागतिक नेतृत्व करू शकत नाही. भौतिक, आर्थिक, औद्योगिक व तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या संपन्न असलेले देशच जागतिक घडामोडींचे संचालन करतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
 
 
 
rss
 
 
 
ते शनिवार १७ जानेवारी रोजी गोंदिया येथील रेलटोली स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवनिर्मित केशव भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टिवार, विभाग संघचालक दलजीतसिंग खालसा उपस्थित होते.
 
 
 
पुढे भैय्याजी जोशी म्हणाले, जागतिक राजकारणात प्रभाव निर्माण करायचा असेल तर आर्थिक सामर्थ्य, उत्पादनक्षमता, विज्ञान-तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगती अनिवार्य आहे. इतिहास सांगतो ज्यांच्याकडे भौतिक बळ आहे, तेच देश आंतरराष्ट्रीय धोरणे, व्यापारनियम आणि जागतिक दिशा ठरवतात. आदर्श महत्त्वाचे असले तरी ते प्रभावी ठरवण्यासाठी सामर्थ्याची जोड आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
संघाच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना ते म्हणाले, व्यक्ती निर्माणासाठी समर्पित जीवन आवश्यक असून त्यागाची जीवनशैली संघात प्रत्यक्ष पाहायला मिळते. संघावर अनेक संकटे आली, परंतु त्याला मोडून काढण्याची ताकद कुणातही नव्हती. संघ सातत्याने वाढत गेला. हिंदू समाज संघटित करणे कठीण मानले जात असतानाही एका छोट्या अंकुरापासून आज संघाचा विशाल वटवृक्ष उभा आहे. लाखो स्वयंसेवकांच्या विश्वासावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज विश्वातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून ओळखली जाते, असे त्यांनी सांगितले.
 
 
संघ कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून दुर्गुणांच्या विरोधात आहे, परिवर्तनाचे खरे सामर्थ्य सकारात्मक विचारांवर आधारित असते. हिंदू विचार हे मुळात सकारात्मक असून विश्वकल्याणासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता आहे. विश्वाचे संचालन करण्याचे सामर्थ्य प्रत्येक हिंदूमध्ये आहे, मात्र समाज दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजाला सामर्थ्यवान बनवावे लागेल. सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी हिंदुत्वाची गरज आहे, असे ते म्हणाले.
 
 
आज कुटुंबव्यवस्था धोक्यात आली असून समाजाने संघटित होऊन सकारात्मक भाव निर्माण करण्याची वेळ आली आहे. आचरणात परिवर्तन घडविल्याशिवाय समाजबांधणी शक्य नाही. आपल्या जीवनातील अनेक धोके आपण स्वतःच निर्माण केले आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये देशभक्ती, राष्ट्रवाद आणि देशप्रेम असावे. प्रामाणिकपणा ही आपली नीती असावी. बाह्य शुद्धतेपेक्षा आंतरिक शुद्धतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
आजच्या समाजाला प्रभावी, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्वांची गरज असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना उद्योग, संघटन, समाजकार्य आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी भैय्याजी जोशी यांच्या हस्ते नवनिर्मित केशव भवनाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. यावेळी भवन निर्माणकर्ता शशी वाढई यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्याम हरकरे लिखित अण्णाजी कुलकर्णी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज जागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लीलाराम बोपचे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण बिसेन यांनी केले. कार्यक्रमाला माजी खासदार सुनील मेंढे, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वयंसेवक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0