तभा वृत्तसेवा
पुसद,
nisha-dange : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व अंकुर साहित्य संघ शाखा पुसदच्या उपाध्यक्ष निशा डांगे (नायगावकर) यांच्या ‘कपाळ गोंदण’ या ललित लेख संग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा वा. ना. देशपांडे ललित लेखन पुरस्कार प्राप्त झाला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या 103 व्या वर्धापन दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या वाङ्मय पुरस्काराचे एका भव्य समारंभात वितरण करण्यात आले.

विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते हे समारंभाध्यक्ष होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मनाली क्षीरसागर कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक सुनील लवटे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विश्वस्त न्या. विकास शिरपूरकर, विश्वस्त माजी सनदी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके, सरचिटणीस विलास मानेकर इत्यादी मान्यवर वाङ्मय विचार मंचावर उपस्थित होते. निशा डांगे यांचे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिक, मासिके दिवाळी अंक यातील कथा, कविता, ललित, समीक्षण इत्यादी साहित्य प्रकारातील भरघोस लिखाण तसेच विविध साहित्यिक कार्य, आयोजन, संपादन कार्य, विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केले आहे. यापूर्वीही ‘कपाळ गोंदण’ या ललित लेख संग्रहास अनेक पुरस्कार मिळाले आहेत.