‘लढा हाच आमचा श्वास’...

17 Jan 2026 11:05:41
मुंबई,
Raj Thackeray's emotional post मुंबई महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जवळपास २५ वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेतून गेली असून, भाजप आणि शिंदे गटाच्या सेनेने महापालिकेवर भगवा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेलाही अपेक्षित यश मिळू न शकल्याने राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
 
 
Raj Thackeray
 
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. ही निवडणूक साधी नव्हती, तर अमाप आर्थिक शक्ती आणि सत्ताशक्तीविरोधात शिवशक्तीची लढाई होती, असे त्यांनी नमूद केले. अशा कठीण परिस्थितीतही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने लढत दिली, याचे त्यांनी कौतुक केले. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मनसेला कधी कधी अपेक्षेइतकी प्रसिद्धी आणि यश मिळाले नाही, ही बाब दुःखद असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, यामुळे पक्ष खचणार नाही किंवा उद्ध्वस्त होणार नाही. जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते आपल्या प्रभागांमध्ये सत्ताधाऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी माणसांविरोधात काही घडले, तर सत्तेत असलेले लोक त्याला जबाबदार असतील, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.
 
 
 
 
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की मनसेचा लढा हा मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी आहे. लढा हेच आपले अस्तित्व असून, दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षांना कार्यकर्त्यांनी घाबरू नये, असा संदेश त्यांनी दिला. पुढील काळात कामाचे विश्लेषण करून नव्या जोमाने कामाला लागावे लागेल, आणि हे सर्व संघटनेने एकत्रितपणे करावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी सांगितले की, निवडणुका येत-जात राहतील, पण मराठी अस्मिता हीच मनसेचा श्वास आहे आणि ती कधीही विसरली जाणार नाही. सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे समर्थक मराठी माणसांसाठी धोका ठरणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. नव्या उद्दिष्टांसह संघटना अधिक मजबूत करून पुन्हा भेटू, असे सांगत राज ठाकरे यांनी आपली पोस्ट संपवली.
Powered By Sangraha 9.0