दादगाव-माळेगाव शिवारात पट्टेदार वाघ व बिबट्याचा संचार

17 Jan 2026 19:16:33
कारंजा लाड,
striped-tiger-leopard-washim : तालुक्यातील मौजे दादगाव व माळेगाव (उजाड) शिवारात गेल्या आठ दिवसांपासून पट्टेदार वाघ तसेच दोन बिबट्यांचा संचार सुरू असल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत व वाशीम जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार कारंजा यांना निवेदन सादर करण्यात आले.
 
 
 
kjh
 
 
 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दादगाव व माळेगाव शिवाराला लागूनच असलेले वनक्षेत्र शासनाने अभयारण्य म्हणून घोषित केले असून, हे क्षेत्र विरळ झाडझुडुपांचे आहे. अशा परिस्थितीत वाघ व बिबट्यांचा संचार मानवी वस्तीच्या अगदी जवळ असणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. या भागात निलगायी व रानडुकरांची शिकार झाल्याच्या घटना घडल्या असून, वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकर्‍यांना ओलीत, निंदण-खुरपणीसाठी शेतात जावे लागत आहे. मात्र, वाघ व बिबट्यांच्या भीतीमुळे सायंकाळी व रात्री शेतात जाणे टाळले जात आहे. याचा फायदा घेत निलगायी व रानडुकरे चणा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत, अशी तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.
 
 
 
दादगाव शिवार वनक्षेत्राला लागून असल्यामुळे वाघ व बिबट गावात शिरण्याची शयता नाकारता येत नसून, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी तातडीने योग्य ती खबरदारी व बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी भारतीय किसान संघ व शेतकरी बांधवांनी केली आहे. या निवेदनावर अनेक शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या असून निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, कारंजा—सोहळ काळविट अभयारण्य यांना देण्यात देखील आली आहे.
Powered By Sangraha 9.0