निघाली ट्रिपल इंजिन एक्सप्रेस...

17 Jan 2026 05:00:00
अग्रलेख
 
 
triple engine ईव्हीएम मशीन ते बोटांवरची शाई, अशा मुद्यांवरील आरोप, मतदान केंद्रांवरील गोंधळ आणि मतदार याद्यांमधील दोष इत्यादी अनेक गोष्टींवरून झालेल्या गदारोळात पार पडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने आणि त्या पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीने दणदणीत विजय मिळविला आहे. आपल्याला जनता सतत नाकारत आहे, हे वास्तव न स्वीकारणे, त्यामागील कारणांचा शोध न घेणे, कारणे दिसली तर त्यावर उप करणे आणि कोणत्याही पूर्वतयारीविना निवडणुकीला सामोरे जाणे ही आता विरोधी पक्षांची खासीयत बनलेली आहे. त्यामुळेच त्यांचा सतत पराभव होतो. महाराष्ट्रातील महानगरांवर तसाही भाजपाचा प्रभाव आहेच. तो यावेळी वाढलेला असल्याचे महापालिकांच्या निकालात दिसून आले. मराठी माणूस वाचवा, मुंबई वाचवा, महाराष्ट्र वाचवा अशी निरर्थक तर्कटे आणि ठाकरे ब्रँड नावाची कल्पना या निवडणुकीच्या निकालांनी पार निकालात काढली. तशी यावेळी महापालिकांच्या निवडणुकीत फार गुंतागुंत होती. कोण कुणासोबत आहे, हेही अनेक ठिकाणी कळत नव्हते. राज्यातल्या सत्तेत एकत्र असलेले एकमेकांच्या विरोधात होते. विरोधकांमध्येही सुंदोपसुंदी होती. भाजपा मात्र आपले नियोजन व्यवस्थित राबवीत होती. त्याचे फळ त्या पक्षाला मिळाले.
 
 

bjp victory 
 
 
 
भाजपाचा दणदणीत विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा, प्रदेश भाजपाच्या नियोजनाचा आणि स्थानिक नेते-कार्यकर्ते यांच्या कष्टाचा परिणाम होय. निवडणूक कशी लढवावी, नियोजन आणि प्रचार कसा करावा, हे सर्व राजकीय पक्षांनी भाजपाकडून शिकण्यासारखे आहे. याऊलट, निवडणुका कशा लढवू नयेत आणि भलतेच मुद्दे उकरून काढत महत्त्वाचा वेळ वाया कसा घालवावा, हे काँग्रेस-उबाठा गट किंवा मनसे यांच्याकडून शिकले पाहिजे. टीव्हीवर महासभेसारखे वातावरण निर्माण केल्याने नव्हे तर तळागाळात पक्ष रुजविल्याने राजकारणात यश मिळत असते, हे आता तरी विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. भाजपा हा समाजाच्या विविध घटकांत रुजलेला पक्ष. त्यामुळे त्याच्या साथीचा महायुतीतील घटकांना फायदा झाला. भाजपाने तर महाविजय मिळविला. महानगरपालिकांच्या निवडणुकीतील भाजपाच्या विजयाने आता महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी विकासाची ट्रिपल इंजिन एक्सप्रेस धावेल. महाराष्ट्रातील नागरी विकास प्रक्रिया त्यामुळे गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे.
गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, त्याची भरपाई देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दामदुपटीने केली. नंतर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका तसेच आताच्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नसल्याचे सिद्ध झाले आहे. लवकरच होणाèया जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा-महायुतीच्या विजयाची पुनरावृत्ती होईल, यात संशय नाही.
महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीची सत्ता असली तरी महायुतीने सर्वत्र संघटितपणे निवडणुका लढविल्या नव्हत्या. अनेक ठिकाणी महायुतीतील तीन प्रमुख पक्ष वेगवेगळे रिंगणात होते. याचा अर्थ महायुतीतील भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांच्यात मतभेद होते, असाही काढला गेला. पण, तो खरा नाही. स्थानिक राजकारणाची गरज म्हणून या तीन पक्षांना काही महानगरपालिकांत वेगवेगळे लढावे लागले. शक्य असेल तेथे ते सोबत आले. आता निकालानंतर महायुतीतील पक्षांना आणि नेत्यांना आपसातील मतभेद आणि निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरुद्ध केलेली जहरी टीका विसरून सोबत काम करावे लागेल. भाजपाने आपल्या ताब्यातील महानगरपालिका कायम ठेवताना काही नव्या महापालिकांवरही यंदा झेंडा रोवला. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे लागले होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 75 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे. देशातील अनेक राज्यांपेक्षा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. तेथून राज्याची सूत्रे हलतात, तसे देशाचे अर्थकारणही वाटा-वळणे घेत असते. त्यामुळे मुंबईत कोणाची सत्ता येईल, याबाबत उत्सुकता असणे स्वाभाविक होते. मुंबई महानगरपालिकेवर अविभाजित शिवसेनेची म्हणजे आधी बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची सत्ता होती. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर मुंबई महानगरपालिका ही ठाकरे घराण्याची जहागिरी होती. यावेळी शिवसेनेने म्हणण्यापेक्षा ठाकरे घराण्याने मुंबई महानगरपालिका गमावली आहे. राज्याची सत्ता गमावल्याचे जेवढे दु:ख ठाकरे घराण्याला झाले नसेल, त्यापेक्षा मोठे दु:ख त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका गमावल्याचे आहे. ठाकरे घराण्याचा प्राण मुंबई महानगरपालिकेत होता. मुंबई महानगरपालिका ही अविभाजित शिवसेना म्हणजे पर्यायाने ठाकरे घराण्यासाठी प्राणवायूचे काम करत होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेली मुंबई महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होती. याच निवडणुकीतून खरी शिवसेना कोणती, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची, याचाही निर्णय होणार होता. मुंबईच्या जनतेने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांना आपसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागले. शिवसेना उबाठा आणि राज ठाकरेंची मनसे सोबत लढले. पण, मराठी आणि अदानीच्या नादात त्यांना निवडणुकीसाठी काय करावे लागते, याचे विस्मरण झाले असावे. राज ठाकरे यांना सोबत घेतल्याचा कोणताही फायदा उद्धव ठाकरे यांना झाला नाही. उद्धव ठाकरेंसोबत गेल्याचा फायदा कदाचित राज ठाकरे यांना झाला असेल.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्यातील महायुतीचे तीन प्रमुख नेते. यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले. अजित पवार मात्र स्वतःचा प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये अजितदादांचा शिक्का चालायचा. शरद पवारांचेही वजन होतेच. यावेळी राजकीय अस्तित्वासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. त्या एकोप्याचा फायदा झाला नाही. जनतेने भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. निवडणूक प्रचाराच्या काळात अजित पवार आणि भाजपाच्या नेतृत्वात जे आरोप-प्रत्यारोप झाले, ते टाळता आले असते तर बरे झाले असते. यावेळच्या महानगरपालिका निवडणुका या काही शेवटच्या निवडणुका नव्हत्या. निवडणुका होतच राहणार आहेत. अजित पवारांकडून जास्त संयमी वागणुकीची अपेक्षा होती. पण, अपेक्षेप्रमाणे त्यांनी अपेक्षाभंग केला. नको त्या वेळी नको ते बोलून ते स्वतःला नेहमीच अडचणीत आणत असतात. यावेळीही तसेच झाले. एका उपमुख्यमंत्र्याचे असे पानिपत झालेले असताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आपली ताकद दाखवून दिली. नागपूर महानगर पालिकेत भाजपाला मिळालेले यश हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या तिघांच्या नेतृत्वाचे यश म्हटले पाहिजे. नागपुरात गडकरी आणि फडणवीस या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नागपूरच्या जनतेने या नेत्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. नागपूरचा निकाल अपेक्षित असाच आहे.
एकंदरीत महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेला विजय म्हणजे विकासाच्या राजकारणावर जनतेने केलेले शिक्कामोर्तब आहे. काँग्रेस, शिवसेनेचा उबाठा गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट किंवा अन्य फुटकळ पक्षांना राज्यातील जनता सतत नाकारते आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही, निवडणुकीचे नियोजन नाही. ईव्हीएममधील दोष दाखवून प्रचाराचा शुभारंभ करायचा ही रीतच झाली असेल तर विरोधक कधीही जनमताचा कौल मिळवू शकणार नाहीत. सूक्ष्म नियोजन, कठोर अंमलबजावणी व अपार कष्ट यातूनच भाजपाला सतत यश मिळते, हे साधे गणित लक्षात न घेता निरर्थक मुद्यांचे ढोल वाजविण्यात मश्गुल राहिलेल्या विरोधकांनी अर्धनागरी निवडणुका गमावल्या. आता शहरे गमावली. जिल्हा परिषदांमध्ये भाजपा व महायुतीची सुसाट एक्सप्रेस पोहोचेल तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाच्या गाडीला चौथे इंजिन लागेल. ट्रिपल इंजिन एक्सप्रेस तर निघालीच आहे!
Powered By Sangraha 9.0