सभागृहात अनुभवी महापौर; उद्धवसेना विरुद्ध भाजपा!

17 Jan 2026 14:20:25
मुंबई,
Uddhav Sena-BJP-BMC election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत उद्धवसेनेने डावपेच आखत चार माजी महापौर आणि एका माजी उपमहापौरांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे या सर्व अनुभवी नेत्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पुन्हा एकदा पालिका सभागृहात दणक्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे आता भाजपकडून निवडून आलेल्या नव्या महापौरांसमोर सभागृहात अनुभवी आणि आक्रमक नेतृत्वाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
 
 
 
bmc
 
 
या निवडणुकीत उद्धवसेनेने माजी महापौर मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आणि किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनाही पुन्हा संधी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ५९ मधून यशोधर फणसे यांनी ६,६१० मते मिळवत भाजपचे माजी नगरसेवक योगिराज दाभाडकर यांचा पराभव केला. दाभाडकर यांना ६,२३७ मते मिळाली.
 
वरळी परिसरात माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागला होता. शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर शिंदेसेनेचे प्रल्हाद वरळीकर हेही मैदानात होते. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करत हेमांगी वरळीकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
 
प्रभाग १८२ मधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी भाजपचे राजन पारकर यांचा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. वैद्य यांनी १४,२४८ मते मिळवत पारकर यांच्यावर ९,८५४ मतांची आघाडी घेतली. दादरमधील प्रभाग १९१ मध्ये विशाखा राऊत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला.
 
प्रभाग २०२ मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळली होती. शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली होती. मात्र, मतदारांनी पुन्हा एकदा श्रद्धा जाधव यांच्यावर विश्वास दाखवत भाजपचे पार्थ बावकर आणि बंडखोर इंदुलकर यांचा पराभव केला.
 
या सर्व अनुभवी नेत्यांच्या विजयामुळे पालिका सभागृहात उद्धवसेनेची भूमिका अधिक आक्रमक आणि प्रभावी राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेतील राजकारण अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0