कानपूर,
murder case : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रेमविवाहानंतर अवघ्या चार महिन्यांतच पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला आणि, “साहेब, मी तिला मारलंय, मृतदेह घरात ब्लँकेटमध्ये आहे,” अशी कबुली दिली.
महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सचिन सिंग आणि श्वेता सिंग यांनी चार महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात कोर्टात लग्न केले होते. सुरतमध्ये काही काळ राहिल्यानंतर दोघे कानपूरला परतले आणि भाड्याच्या खोलीत राहू लागले. काही दिवसांपासून सचिनला पत्नीच्या वागण्यावर संशय होता.
शुक्रवारी रात्री सचिन अचानक घरी परतला असता श्वेता शेजारच्या खोलीतील काही तरुणांसोबत बसलेली दिसली. यानंतर वाद झाला आणि पोलिसांनाही बोलावण्यात आले. प्रकरण मिटवून सर्वांना घरी पाठवण्यात आले, मात्र घरी गेल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. याच रागाच्या भरात सचिनने श्वेताचा गळा दाबला, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घाबरलेला सचिन काही तास इकडे-तिकडे फिरल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेमविवाहातून निर्माण झालेल्या संशय आणि तणावाचे हे टोकाचे उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

सौजन्य: सोशल मीडिया