कालवा फुटल्याने शेताला तलावाचे स्वरूप

17 Jan 2026 19:55:29
वर्धा,
wardha-news : हिंगणघाट तालुक्यातील मोझरी-कापसी निम्न वर्धा प्रकल्पाच्या वितरिकेचा कालवा कापसी शिवारात फुटल्याने शेतकर्‍यांच्या शेतात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतातील भाजीपाला व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांच्या वेदनांवर कालव्याचा घाव दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
 
jlk
 
हा कालवा मोझरी ते कापसीदरम्यान जात असून शुक्रवार १६ रोजी रात्रीच्या सुमारास कापसी येथील शेताजवळ अचानक फुटला. कालव्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडझुडपे वाढलेली असून, वितरिकेमध्ये कचरा साचलेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत न होता अडथळे निर्माण होतात. परिणामी, पाणी साचून खोलगट भागात दाब वाढतो आणि कालवा फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे, निम्न वर्धा प्रकल्पाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून अनेक ठिकाणी काम रेंगाळलेले आहे. वितरिकेची नियमित साफसफाई व दुरुस्ती होत नसल्यामुळे दरवर्षी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते.
 
 
खरीप हंगामात उत्पन्नात चांगलीच घट आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना खरीप हंगामाचा खर्च भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभर्‍याची पेरणी केली आहे. सध्या पीक फुलावर आहे. शेतकर्‍यांना डवरणी, निंदण तसेच खताची मात्रा देवून पीक चांगल्या स्थितीत ठेवत आहेत. मात्र, दरवेळी रब्बी हंगामात सिंचनासाठी निम्न वर्धा प्रकल्पामार्फत कालव्यात पाणी सोडले जाते. मात्र, या विभागाकडून कालव्याची साफसफाई व दुरुस्ती होत असल्याने शेतकर्‍यां शेतात थेट पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या कालव्याची दुरुस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी अनेकवेळा शेतकर्‍यांनी केली. मात्र, प्रशासनाला जाग येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहेत.
 
.
नुकसान भरपाई द्या ः शेतकरी शेंडे
 
 
कालव्याचे पाणी माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात शिरले आहे, त्यामुळे भाजीपाला पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून गहू पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील काही महिन्यांपूर्वीही याच वितरिकेला भगदाड पडले होते. त्यावेळीही तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन कालव्याची दुरुस्ती करावी, साफसफाई करावी व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित भरपाई द्यावी.
Powered By Sangraha 9.0