वर्धा,
pankaj-bhoyar : वर्धा शहरालगतच्या वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकण्यात येतो. परिणामी, शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच शहरातील प्रदूषणातदेखील वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने घनकर्याचे नियोजन करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यासाठी शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे, काही अडचणी व तक्रार असल्यास समितीस सादर कराव्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नगर परिषदेचे अध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, तहसीलदार संदीप पुंडेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
शहरालगतच्या नालवाडी, बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), पिपरी (मेघे), सेवाग्राम, आलोडी, उमरी (मेघे), म्हसाळा, सावंगी (मेघे), वरुड व पवनार या अकरा गावातील घनकचरा व्यवस्थापनासाठी समितीमार्फत कचरा संकलनासाठी तीन झोन बनविण्यात येणार आहे. गावातील संकलित झालेला घनकचरा झोननिहाय डंम्पीगयार्ड मध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा घनकचरा व्यवस्थापनाचा आर्थिक भार कमी होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीमार्फत गोळा झालेला घनकचरा झोनपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वाहन उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे ग्रामपंचायतींनी कचरा गोळा करणार्या गाड्या प्रत्येक वार्डामध्ये दररोज गेल्या पाहिजे, याबाबत नियोजन करा. तसेच मंगल कार्यालय व हॉटेल यांनी उघड्यावर कचरा टाकू नये. कचरा टाकतांना आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करा ः वान्मथी सी
घनकचर्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यावर आळा घालणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करा. प्लॉस्टिक वापरणार्यांसोबतच विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिले.