आता पाळीव श्वान, मांजरीचे नोंदणीकरण आवश्यक

17 Jan 2026 20:13:43
वर्धा, 
pet-dog-cat-registration : मोकाट श्वानांचे वाढते प्रमाण आणि होणारा त्रास याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन श्वानांचे जन्मदर नियंत्रण, नोंदणी याबाबत राज्यातील मुख्य सचिव यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करून राज्यातील सर्व जिल्ह्यात मोकाट श्वानांचे जन्मदर नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे.
 
 
 
ASf
 
 
 
मोकाट श्वानांना पकडणे तसेच अँटी रेबीज लसीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे. जिल्हास्तरीय जिल्हा प्राणिलेश प्रतिबंधक समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव उपायुक्त पशुसंवर्धन आहेत. उपायुक्तांच्या सूचनांप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांना सूचित करण्यात आले आहे. पाळीव श्वानांचे नोंदणीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे. कारण बरेचदा पाळीव श्वान चावल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास जवाबदारी स्वीकारली जात नाही. पाळीव कुत्र्याचा त्रास झाल्यास तक्रार दाखल होत नाही. या प्रकारामुळे आता पाळीव श्वानांचे नोंदणीकरण आवश्यक करण्यात आले आहे. आपल्याकडील पाळीव श्वानाचा दुसर्‍यांना त्रास झाल्यावर बरेच वेळा हा श्वान आमचा नाही, अशी भूमिका घेण्यात येते.
 
 
यामुळे वर्धा जिल्ह्यातील पाळीव श्वान व मांजरीची नोंदणी करण्याची जबाबदारी पीपल फॉर अ‍ॅनिमल्स या संस्थेने स्वीकारली असून याबाबतचा संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनात सोपविण्यात येणार आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बुकदरे, उप आयुक्त डॉ. संजय खोपडे तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेळके यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. काही नागरिकांनी आपल्या पाळीव श्वानांची नोंदणी करून घेतली आहे. पाळीव प्राण्यांची नोंदणी करायची असल्यास जिल्हा सर्व पशु चिकित्सालय शिवाजी चौक वर्धा तसेच पीपल फॉर अ‍ॅनिमल्स पिपरी मेघे वर्धा येथे संपर्क साधावा, असे पशुसंवर्धन विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0