अखेर पुरवठा विभागाकडून पेट्रोलपंपाची तपासणी

17 Jan 2026 19:20:43
कारंजा लाड, 
petrol-pump-inspection : शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत. या तक्रारी केवळ बोलण्यापुरत्या मर्यादित न राहता अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्याकडे लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या होत्या. ग्राहक पंचायतच्या पदाधिकार्‍यांनी या गंभीर बाबीची दखल घेत तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार निवेदने देऊन प्रत्यक्ष पाहणी व दोषी पंपांवर कारवाईची ठोस मागणी केली होती.
 
 

j  
 
 
मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल तीन वर्षांनंतर अखेर पुरवठा विभागाला या तक्रारींची आठवण झाली. त्यानंतर शहरातील ९ पेट्रोल पंपांची पाहणी व तपासणी करण्यात आली. या तपासणीत जे वास्तव समोर आले, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. तपासणीदरम्यान अनेक पेट्रोल पंपांवर स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहांचा अभाव, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, मेडिकल किट उपलब्ध नसणे,अग्निरोधक यंत्रे नसणे किंवा नादुरुस्त असणे, स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी रस्ताच नसणे, दर्शनी भागात आवश्यक माहितीचे फलक नसणे, मोफत हवा भरण्याची मशीन बंद अवस्थेत असणे आणि धूम्रपान निषेधाचे फलक नसणे अशा अनेक गंभीर त्रुटी स्पष्टपणे आढळून आल्या. त्यामुळे हे सर्व नियम केवळ कागदावरच आहेत का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
 
 
कारण पेट्रोल पंप हे अपघातप्रवण ठिकाणे असून येथे सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या सुरक्षिततेशी सर्रास तडजोड केली जात असल्याचे चित्र दिसून येते.ही तपासणी प्रभारी तहसीलदार अनिल वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी स्मिता नायगावकर व त्यांच्या पथकाने केली. मात्र तपासणी होऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अधिक गंभीर आहे. तपासणी करून दोष नोंदवणे आणि नंतर त्यावर कारवाई न करणे, यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्राहकांच्या दैनंदिन गरजेशी संबंधित असलेल्या पेट्रोल पंपांवर जर नियमांचे उल्लंघन होत असेल आणि त्याकडे प्रशासन डोळेझाक करत असेल, तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
 
दोषी पेट्रोल पंपांवर दंडात्मक कारवाई, सुधारणा करण्यासाठी ठरावीक मुदत आणि पुन्हा तपासणी हे सर्व टप्पे तातडीने राबवले गेले नाहीत, तर ही पाहणी केवळ औपचारिक ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. शिवायतपासणी झाली, दोष सापडले पण कारवाई कधी? की ग्राहकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा फाइलमध्येच अडकून राहणार? असे प्रश्न उपस्थित करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने त्रुटी आढळून आलेल्या पेट्रोल पंप संचालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0