नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले

17 Jan 2026 19:52:35
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर,
yavatmal-news : माहूरचे तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदीपात्रावरील कुप्रसिद्ध चोले पेंड, काळे पेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राममहसूल अधिकाèयांनी संयुक्त कारवाई करत तीन तराफे जाळून नष्ट केल्याची घटना शनिवार, 17 रोजी दुपारी 1 वाजता घडली.
 
 
y17Jan-Tarafa
 
माहूर शहरासह तालुकाभरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवून वाळू तस्करी रात्रंदिवस सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाऊन्सरच्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
 
 
वाळू तस्कराकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली असून वाईबाजार, वानोळा, कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली. त्यांना चोले पेंड येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने येथे ग्राममहसूल अधिकारी साहेबराव गावंडे, शीतल ढाकुलकर, ममता गेडाम, उषा देवतळे, ज्योती दुर्योधन, महसूलसेवक दीपक लोखंडे यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांच्या पाहणीत तीन तराफे आढळून आले. त्यामुळे नदीपात्रात जाऊन तीन तराफे नदीकाठावर जमा करून तराफे जाळून टाकण्यात आले तसेच नदीपात्रावर जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले.
 
 
माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीत जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळीचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्नीशस्त्र तत्काळ पुरवावे, अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0