विदेशी पाहूण्यांसह ६६९९ पक्ष्यांची किलबील

18 Jan 2026 21:37:52
- पक्षी गणनेत ७८ प्रजातींची नोंद : नवेगावबांध तलावात सर्वाधिक
प्रमोदकुमार नागनाथे
 
गोंदिया, 
दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच गोंदिया व भंडारा जिल्ह्यात Arrival of foreign birds विदेशी पक्ष्यांचे आगमन होत असून हे पक्षी जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालत असतात. दरम्यान, या परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे निसर्गप्रेमीसह पर्यटकांसाठी एक पर्वणीच राहते. दरम्यान, पक्षी निरीक्षक व वनविभागाच्या वतीने यंदा करण्यात आलेल्या ४० व्या पक्षी गणनेत या विदेशी पक्ष्यांसह ६ हजार ६९९ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या गणनेत पक्ष्यांच्या ७८ प्रजाती आढळून आल्या असून सर्वाधिक पक्षी नवेगावबांध तलाव परीसरात दिसून आल आहेे.
 
 
pakshi
 
तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया व लगतच्या भंडारा जिल्ह्याची सर्वदूर ओळख आहे. थंडीमुळे येथे Arrival of foreign birds  स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले असून पक्षीप्रेमींचा उत्साह आणि धरण व तलावांचे सौंदर्य वाढले आहे. अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन अनेक पक्षी युरोपीय देशातून जवळपास १० हजार किमीचा प्रवास करून जिल्ह्यात दाखल होतात. सायबेरीया येथून येणारे हे स्थलांतरित पक्षी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात पोहचत असताना वसंत पंचमीपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. या अनुषंगाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वेट लँड इंटरनॅशनल साऊथ-एशिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील वन विभाग, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातर्फे ११ जानेवारी रोजी दोन्ही जिल्ह्यातील २४ तलावांवर पक्षी गणना करण्यात आली. ज्यामध्ये पक्ष्यांच्या ७८ प्रजाती आढळून आल्या असून ६ हजार ६९९ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यात ४३ स्थानिक प्रजाती, ५ निवासी स्थलांतरीत तर ३० हिवाळी स्थलांतरीत प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक १ हजार २०७ पक्षी नवेगावबांध तलावावर तर १ हजार ६५ पक्ष्यांची झिलीमीली तलावात नोंद करण्यात आली आहे. मुख्यतः गणनेत लेसर व्हिसलिंग डक ८१३, नॉर्दन पिंटेल ७२१ व ६९२ स्वॅलोः कॉमन स्वॅलो, वायर टेल्ड स्वॅलोची नोंद करण्यात आली आहे.
 
 
या पक्ष्यांची झाली नोंद ...
लाँग लेग्स बझर्ड (ब्युटिओ रुफिनस) हा ब्युटिओ वंशातील पक्षी आहे जो तलावात आढळणार्‍या मोठ्या प्रजातींपैकी एक आहे. नवेगावबांध तलावात दुर्मिळ अल्पाइन स्विफ्टची नोंद झाली. जवळजवळ सर्वच जलस्रोतांवरून लिटिल कॉर्मोरंट, लिटिल एग्रेट, इंडियन पॉन्ड-हेरॉन, व्हाईट-ब्रेस्टेड किंगफिशरची नोंद झाली. सारस क्रेन, ग्रे हेडेड फिश-ईगल, भंडारा-गोंडिया लँडस्केप ज्यासाठी ओळखला जातो अशा दोन महत्त्वाच्या आणि धोक्यात आलेल्या प्रजातींची नोंदही करण्यात आली असून ग्रे-हेडेड लॅपविंग, ब्राउन क्रॅक, ऑस्प्रे सारख्या दुर्मिळ स्थलांतरित प्रजाती कमी संख्येने आढळल्या. तर लेसर व्हिसलिंग डक, ग्रे-हेडेड (पर्पल) स्वॉम्फेन, कॉमन कूट आणि कॉटन पिग्मी यासारख्या निवासी शाकाहारी प्रजाती चांगल्या संख्येने दिसून आल्या. लिटिल कॉर्मोरंट्स सारखे मातीतील मासे व किटक खाणारे रहिवासी पक्षी मोठ्या संख्येने दिसले. स्थलांतरित बदके, ज्यामध्ये नॉर्दर्न पिंटेल, गार्गेनी, टफ्टेड डक, युरेशियन विजॉन, गॅडवॉल, नॉर्दर्न शोव्हलर, रेड-क्रेस्टेड पोचार्ड या विदेशी पक्ष्यांचीही नोंद करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0