मंगरूळनाथ,
waste collection, शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचर्यामुळे आणि नाल्यांमधील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवनिर्वाचित नप उपाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, २२ जानेवारीपर्यंत काम पूर्ण न झाल्यास उपाध्यक्षाच्या खुर्चीवर कचरा टाकण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गावंडे यांनी म्हटले आहे की, शहराच्या विविध प्रभागांमध्ये ओला व सुका कचरा तसेच नाल्यांमधील घाण रस्त्यावर आणि गल्लीबोळात तशीच पडून आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली असून, आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. प्रशासनाने २२ जानेवारी पर्यंत शहरातील कचरा संकलनाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर विहित मुदतीत स्वच्छता झाली नाही, तर २३ जानेवारी रोजी सभागृहातील उपाध्यक्षाच्या खुर्चीला झाडू, फावडी आणि टोपल्यांनी शहरात जमा झालेला कचरा अर्पण करणार असा इशारा दिला आहे.जोपर्यंत संपूर्ण शहरातील कचरा आणि घाण उचलली जात नाही, तोपर्यंत आपण पदग्रहण करणार नाही असा निर्धारही अनिल गावंडे यांनी केला आहे.