सावता परिषदेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाशीम,
विद्यमान भाजपा व शिवसेना शिंदे सरकारने सुरु केलेली 'Ladya Bahin' लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरु केली. सुरुवातीच्या काळात महिलांना नियमीत हप्त मिळाले. मात्र, ई केवायसी करुनही नोव्हेंबर व डिसेंबर चा हप्ता मिळाला नसल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयार धडक दिली. एकतर नियमीत हप्ते द्या नाहीतर ही योजना कायमची बंद करा, अशा आशयाचे निवेदन दिले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी विद्यमान सरकारने निवडणुकीपूर्वी 'Ladya Bahin' लाडकी बहीण योजना सुरु केली. सुरुवातीला सरसकट महिलांना प्रत्येकी १५०० रुपये नियमीत देण्यात आले. त्यानंतर विविध अटी व नियम लावत या योजनेतील लाभार्थी महिलांना कात्री लावण्याचे काम सुरु आहे. ई केवायसी करा, कुटूंबातील दोन महिलांना लाभ मिळणार, घरी चारचाकी वाहन असल्यास हप्ता बंद करण्यात येणार, कर भरणार्या कुटुंबातील महिलांना पैसे मिळणार नाहीत, अशा विविध अटी घालून महिलांना अपात्र करण्यात आले. परंतु, अनेक महिला ह्या गरीब व गरजु आहे तसेच शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमानुसार पात्र आहेत. ई केवायसी प्रक्रिया देखील पुर्ण केली. तरी सुध्दा अनेक महिलांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही.
याबाबत सावता परिषदेचे वाशीम शहराध्यक्ष चेतन इंगोले यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. थकीत हप्ता महिलांना मिळाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.